'गोकुळ' दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळेंचा राजीनामा; गुरुवारी 22 रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब
schedule20 May 25 person by visibility 320 categoryउद्योग

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या, कोल्हापूर अर्थात 'गोकुळ' दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी मंगळवारी सकाळी राजीनामा दिला.
त्यांनी राजीनाम्याचे पत्र, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे दिले त्यांनी तातडीने संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांच्याकडे ते सादर केले. गुरुवारी (दि. २२) संचालक मंडळाची बैठक होत असून यामध्ये डोंगळे यांचा राजीनामा मंजूर केला जाणार आहे.
अरुण डोंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे करत राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यावरुन, गेली सात दिवस राजीनामा नाट्य सुरू होते.
रविवारी, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत झालेल्या बैठकीत मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन राजीनामा देण्याची सूचना केली होती. त्यानुसार डोंगळे सोमवारी दुपारीच मुंबईकडे रवाना झाले. मंगळवारी सकाळी अकरा वाजता त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे दिला, पाटील यांनी तो कार्यकारी संचालक डॉ. गोडबोले यांना दिला.
संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा मंजूर झाल्यानंतर हा राजीनामा डीडीआर (दुग्ध) पुणे यांच्याकडे पाठविला जाईल. त्यांच्या अंतिम मंजुरीनंतर तेथून हा राजीनामा राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवला जाईल. प्राधिकरणाने नवीन अध्यक्ष निवडीची तारीख दिल्यानंतर अध्यक्ष निवड होईल. दरम्यान १२ जूननंतर नव्या अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे.