SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा बिगुल; अँड. आकाश मोरे यांच्या रूपाने नवा चेहरा मैदानातविधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम: पंतप्रधान मोदींचा तृणमूलवर प्रहार, तर राहुल गांधींचे आसाममध्ये सभाबळीराजाला मोठा दिलासा: अस्मानी संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्रीभोंदूगिरीविरुद्ध राज्य सरकारचा कडक पवित्रा; अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून १५०० कोटींच्या घोटाळ्याचा संशयसिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकर्मयोगी भारत साधना सप्ताहात प्रशासनातील सर्वांनी सहभाग घ्यावा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडमहाराष्ट्र शासनाच्या कृतीशील धोरणामुळे क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान: मंत्री चंद्रकांतदादा पाटीलईस्टर संडे: पुनरुत्थानाचा सण आणि मानवतेचा नवा प्रवासईस्टर निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छाजयसिंगराव पवार यांच्या जाण्याने मराठा इतिहासाचा संदर्भग्रंथ काळाच्या पडद्याआड गेला : आमदार सतेज पाटील; कुटुंबियांची सांत्वनपर भेट

जाहिरात

 

महाराष्ट्र शासनाच्या कृतीशील धोरणामुळे क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान: मंत्री चंद्रकांतदादा पाटील

schedule05 Apr 26 person by visibility 110 categoryक्रीडा

◼️३७२ क्रीडापटूंचे शासकीय सेवेत थेट समावेशन
◼️सांगलीत अखिल भारतीय कनॉईंग, कयाकिंग स्पर्धांचे उत्साही उद्घाटन

सांगली :  क्रीडाक्षेत्र हा करिअरचा सक्षम पर्याय म्हणून सामोरा येत असून महाराष्ट्र शासनाच्या सकारात्मक व कृतिशील धोरणामुळे येथील राज्यातील क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान प्राप्त होत आहे. विविध क्रीडाप्रकारांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या ३७२ खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये विनापरीक्षा थेट सामावून घेण्यात आले आहे,  असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे केले. 

भारतीय विद्यापीठे महासंघ (ए.आय.यू.) आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कनोईंग व कयाकिंग (पुरुष व महिला) स्पर्धांचे उद्घाटन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आज सकाळी येथील कै. वसंत दादा पाटील स्मृती स्मारक, कृष्णा नदीवरील रॉयल बोट क्लब येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार धनंजय उर्फ सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, कलापि उद्योगाचे योगेश लोहकरे, अधिसभा सदस्य संजय परमणे, काव्यश्री नलवडे आदी उपस्थित होते.


मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, क्रीडा क्षेत्रात करिअर घडविणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहनपर धोरणे लागू केली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना थेट वर्ग एकची शासकीय नोकरी, राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक विजेत्यांना वर्ग दोन, तर राज्य स्तरावरील विजेत्यांना वर्ग तीन व चारची पदे देण्याचा निर्णय शासनाने घेतला. याशिवाय, क्रीडापटूंना आर्थिक बळ देण्यासाठी आकर्षक रोख पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्यांना रुपये २ कोटी, राष्ट्रीय स्तरावर रूपये एक कोटी आणि राज्य स्तरावर रुपये ५० लाख इतकी बक्षिसे दिली जात आहेत, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवणाऱ्या तेजस्विनी सावंत यांचे पालकत्व घेतल्याचा उल्लेख करत क्रीडापटूंना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या पाठबळाचे महत्त्व अधोरेखित केले.

मंत्री पाटील यांनी पुढे सांगितले की, भारत सन २०३६च्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी सज्ज होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, शिवाजी विद्यापीठाला शिक्षण, संशोधन आणि क्रीडा क्षेत्रातील सहा दशकांची समृद्ध परंपरा लाभली असून क्रीडा क्षेत्रातही विद्यापीठ अग्रस्थानी आहे. कृष्णा नदीवरील स्पर्धेचा ट्रॅक हा शास्त्रीयदृष्ट्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून पाण्याचा प्रवाह स्थिर असल्यामुळे सर्व स्पर्धकांना समान संधी मिळते. देशात क्वचितच आढळणारा सुमारे ९४० मीटरचा सरळ व अडथळेमुक्त ट्रॅक ही या कृष्णा नदीतील स्पर्धास्थळाची खास वैशिष्ट्ये असल्याचे सांगत त्यांनी सर्व सहभागी खेळाडूंना उत्कृष्ट क्रीडा स्पर्धात्मकतेसह सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.

सुरवातीला मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून आणि ध्वजारोहण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच, प्रदर्शनीय सामन्यांना मंत्री पाटील यांच्या हस्ते फ्लॅग ऑफने प्रारंभ करण्यात आला. 

क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महादेव ठोंबरे, सोनाली पाटील व डॉ. श्रीदेवी पवार-हिरुगडे यानी सूत्रसंचालन केले, तर अधिसभा सदस्य श्रीनिवास गायकवाड यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes