कर्तृत्ववान, शिस्तप्रिय आणि निश्चयी नेतृत्व असलेल्या अजितदादांच्यारूपाने वैयक्तिक मित्र गमावला
schedule23 Feb 26 person by visibility 85 categoryसामाजिक
▪️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल विधानसभेत शोकप्रस्ताव मांडत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कर्तृत्ववान, शिस्तप्रिय आणि निश्चयी नेतृत्व असलेल्या अजितदादांच्या रूपाने आपण वैयक्तिक मित्र गमावला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोकप्रस्तावावर म्हणाले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यमग्नतेचे प्रतीक होते. वक्तशीरपणा, शिस्त आणि निर्णयक्षमतेची सांगड त्यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत घातली. मंत्रालयात वेळेआधी उपस्थित राहून दिवसभर कामकाजाचा आढावा घेणे आणि कोणतीही फाईल प्रलंबित न ठेवणे ही त्यांची कार्यपद्धती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रशासनात एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असे.
प्रत्येक विषयाचा बारकाईने अभ्यास, स्पष्ट भूमिका आणि निर्णय घेण्यातील धाडस यामुळे ते प्रभावी प्रशासक म्हणून ओळखले जात. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाची भावना होती. राज्यहिताचा प्रश्न आला की, राजकीय भेदाभेद बाजूला ठेवून सकारात्मक भूमिका घेणे ही त्यांची कार्यसंस्कृती होती, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राज्याच्या विकासात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पायाभूत सुविधा, वित्त, शेती आणि सिंचन या क्षेत्रांत त्यांनी ठोस आणि दूरगामी निर्णय घेतले. लोककल्याणाच्या योजनांबाबत त्यांनी ठाम भूमिका घेत राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याचा ठसा आणि त्यांनी निर्माण केलेली कार्यसंस्कृती पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा शब्दात त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
▪️"अजित पवारांच्या रुपात महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळाला असता"
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘अजित पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड’, अजितदादाच्या रुपात एक चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता, तो आता आपल्यामध्ये नाही. त्यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी आवश्यक संपूर्ण क्षमता, दृढ निश्चय आणि प्रामाणिकता होती, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
दिवंगत अजित पवारांसारखा नेता जेव्हा आपल्यातून निघून जातो, तेव्हा खऱ्या अर्थानं पोकळी म्हणजे काय हे लक्षात येतं. ती पोकळी केवळ राजकीय नाही, तर भावनिकही आहे. काही जखमा काळ बऱ्या करतो, पण काही वेदना कायम राहतात, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी मंत्री सुरुपसिंग नाईक, डॉ. शालिनीताई वसंतराव पाटील, राज खंगारजी पुरोहित तसेच माजी सदस्य गंगाधर महालप्पा पटने, नीळकंठ चिंतामण फालक, विश्वास रामचंद्र नांदेकर आणि रुपलेखा खंडेराव ढोरे यांच्या निधनाबद्दलही शोक व्यक्त केला.