उज्वल भविष्यासाठी टाकलेले प्रत्येक पाऊल 'काउंट' होते : प्रफुल्ल खचणे; केआयटी च्या पायोनियर या टेक फेस्टची यशस्वी सांगता
schedule23 Feb 26 person by visibility 236 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील पायोनियर २६ हा २ दिवसीय टेक्नो फेस्ट दि. २२ फेब्रुवारी २६ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला.या टेक फेस्ट मध्ये १२ स्पर्धांच्या माध्यमातून ,१४ राज्य व जवळपास ९० महाविद्यालयातून ६००० स्पर्धक सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते प्रफुल्ल खचणे, संस्थापक व्यवस्थापकीय संचालक जिओ मॅट्रिक्स ऑटोमेशन अँड रोबोटिक्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे.मुख्य अतिथींचा परिचय विद्यार्थी प्रतिनिधींनी करून दिला.त्यानंतर त्यांचे स्वागत संस्थेचे विश्वस्त श्री सुनील कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ श्रीफळ, शाल व महालक्ष्मीची प्रतिमा देऊन केले.आय.एस.टी.ई.स्टुडन्ट चाप्टरच्या फॅकल्टी ॲडव्हायझर प्रा.अश्विनी शिंदे यांनी पायोनियर २६ चा एकत्रितपणे दर्जात्मक व संख्यात्मक आढावा उपस्थितांसमोर ठेवला.
मुख्य पाहुणे प्रफुल्ल खचणे यांनी देशातील विदेशातील अनेक कंपन्यांच्या सोबत काम करताना जो अनुभव त्यांना मिळाला तो त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. इंडस्ट्री ४.० च्या माध्यमातून उद्योगातील सर्व प्रकारच्या संसाधनांना एकत्रित रित्या देखरेखी खाली आणत त्या संसाधनांच्या माध्यमातूनच सर्व प्रकारच्या उद्योग क्षेत्रातील विभागांना निर्णय घेण्यासाठी उपयुक्त माहिती कमी वेळेत उपलब्ध करणे या गोष्टी सहज शक्य होत आहे. इंडस्ट्री ४.० च्या माध्यमातून जागतिक स्तरावर योगदान देण्यासाठी आपण सर्वांनी ऑटोमेशन ही संधी मानावी मत खचणे यांनी व्यक्त केले. ए.आय.च्या माध्यमातून स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये मोठी झेप घेता येणे शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भविष्यातील यशस्वी जीवनासाठी टाकलेले तुमचे प्रत्येक पाऊल हे गणले जाणार आहे. त्यामुळे आपली वाटचाल विचारपूर्वक करावी व स्वतःचा,समाजाचा,देशाचा उत्कर्ष साधावा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, विश्वस्त संचालक आय.एम.ई.आर. यांनी या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. देशभरातून सहभागी झालेल्या सर्व सहभागी स्पर्धकांचे प्रथमतः त्यांनी मनापासून अभिनंदन केले. जर सहभाग घेतला नाही तर अनुभव कसा येणार आणि अनुभव जर मिळाला नाही तर आपली प्रगती होऊ शकत नाही असे मत त्यांनी याप्रसंगी केले. विद्यार्थ्यांनी प्रागती करण्यासाठी स्वतःच्या कंफर्ट झोन मधून बाहेर पडून आपला कर्मपथ निश्चित करून त्याच्यावर सातत्याने मार्गक्रमण करत राहावे यश तुमचेच आहे असा सल्लाही दिला.
देशभरातून सहभागी झालेल्या निवडक प्रतिनिधींचे या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अनुभव कथन संपन्न झाले. दर्जेदार स्पर्धा,त्याच प्रकारे सर्व स्तरावरील व्यवस्था व सहकार्या बद्दल त्यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले. अभिव्यक्ती या पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये व्हीजेटीआय, डी.जे.संघवी इंजिनिअरिंग कॉलेज मुंबई, गोगटे इंजिनिअरिंग कॉलेज बेळगावी,सीओईपी विद्यापीठ पुणे, केआयटी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादित केले.तर प्रकल्प या प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये क्राईस्ट डीम्ड युनिव्हर्सिटी बेंगलोर, सरस्वती इंजिनिअरिंग कॉलेज, खारघर, मुंबई केएलई टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी बेळगावी, अजिंक्य डीवायपाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग,पुणे ,डी.जे.संघवी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सांगली, व्हिजेटीआय या केआयटी या महाविद्यालयांनी विविध गटातील पारितोषिक प्राप्त केले
पायोनियर-२६ साठी समाजातील विविध उद्योजकांनी, व्यावसायिकांनी सहकार्य केले अशा सर्व प्रायोजकांचे स्मृतिचिन्ह देऊन आभार व्यक्त करण्यात आले. या पूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी घेतलेल्या आय.एस.टी.ई. च्या विद्यार्थी टीमचे एकत्रित अभिनंदन मुख्य अतिथींच्या हस्ते करण्यात आले.सर्वोत्कृष्ट आयोजकाचा सन्मान यावर्षी मेक्यानिकल विभागाला मिळाला.
या समारोप कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक डॉ मोहन वनरोट्टी, रजिस्ट्रार डॉ.डी.जे.साठे,सर्व अधिष्ठाता विभाग प्रमुख प्राध्यापक कर्मचारी,सर्व विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन सचिव दीपक चौगुले यांचे मोठे प्रोत्साहन यासाठी लाभले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिशा कल्याणकर, मांगरीश प्रभावळकर, आयुषी वासनिक, आर्यन शर्मा, चैत्राली पाटील, मृण्मयी झिरंगे या विद्यार्थ्यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ जितेंद्र भाट अधिष्ठाता, विद्यार्थी उपक्रम यांनी केले.कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली.