सायबर जनजागृती महिन्यानिमित्त कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने डिजिटल सायबर चित्ररथाचे उद्घाटन
schedule08 Oct 26 person by visibility 193 categoryसामाजिक
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती निर्माण करणे, नागरिकांना सायबर फसवणुकीच्या विविध प्रकारांची माहिती देणे तसेच सायबर सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करणे या उद्देशाने ऑक्टोबर महिना "सायबर जनजागृती महिना" म्हणून साजरा करण्यात येत आहे.
या अनुषंगाने दि. ०८ ऑक्टोबर २०२६ रोजी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने डिजिटल सायबर चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. सदर डिजिटल सायबर चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट लिंक व संदेश, OTP/UPI फसवणूक, सोशल मीडिया फसवणूक, डिजिटल अरेस्ट तसेच सुरक्षित डिजिटल व्यवहाराबाबत दृकश्राव्य माध्यमातून प्रभावीपणे माहिती देण्यात येणार आहे.
सदर उपक्रमाचा मुख्य उद्देश "सायबर गुन्हा घडण्यापूर्वीच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी" हा असून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीस बळी पडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती व्यापक प्रमाणात पोहोचविण्यात येणार आहे.
डिजिटल सायबर चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा व नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या ठिकाणी सायबर जनजागृतीपर संदेश प्रसारित करण्यात येणार आहेत. तसेच सायबर कॉलेजच्या पथनाट्य पथकाच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करून नागरिकांना सायबर सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे.
या उद्घाटनप्रसंगी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर नीलोत्पल, पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र म्हस्के, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, कोल्हापूर श्री. संजय हारुगडे, सायबर पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार, पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच सायबर कॉलेजचे पथनाट्य पथक उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अनओळखी व्यक्तींकडून प्राप्त होणाऱ्या लिंक, OTP, PIN, पासवर्ड, बँक खात्याची अथवा वैयक्तिक माहिती कोणत्याही परिस्थितीत शेअर करू नये. ऑनलाइन व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा तसेच www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.
सायबर सुरक्षितता हीच आपली सामूहिक जबाबदारी" या संदेशासह ऑक्टोबर महिन्यात राबविण्यात येणाऱ्या विविध सायबर जनजागृती उपक्रमांमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे.