SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रार्थना संगीत ही जीवन उन्नतीची दिशा: कैशवचैतन्य कुंटेविनापरवाना व्यवसायांवर महापालिकेची कारवाई; ५१ व्यवसायधारकांना नोटिसा; ३ लाख १० हजारांची थकबाकी वसूलगोकुळ दूध संघ निवडणूक: महायुतीच्या 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी'चे पॅनेल जाहीर; दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत घडामोडींना वेगगोकुळ दूध संघ निवडणुकीत 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'च्या पॅनलची घोषणा दणदणीत जाहीरनामा जाहीर; दूध उत्पादकांसाठी सवलतींचा वर्षाव!सायबर जनजागृती महिन्यानिमित्त कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने डिजिटल सायबर चित्ररथाचे उ‌द्घाटनग्रामीण भागातील अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी नागरिकांचा प्रतिसादहेरवाड, शिरदवाड आरोग्य उपकेंद्रांना राष्ट्रीय NQAS मानांकननटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; अभिनय, संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा काळाच्या पडद्याआडज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन; चित्रपटसृष्टीत शोककळाभारतीय हवाई दल दिन: शौर्य, पराक्रम आणि देशसेवेचे प्रतीक

जाहिरात

 

नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; अभिनय, संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा काळाच्या पडद्याआड

schedule08 Oct 26 person by visibility 167 categoryसामाजिक

🌑 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
 
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे काळाच्या पडद्याआड गेला आहे. नटसम्राट नानांची अशी आकस्मिक एक्झिट धक्कादायक आहे, अशी शोकमग्न भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाना पाटेकर यांनी घेतलेली भूमिका कलाक्षेत्रासह, अनेकांना सामाजिक बांधिलकीचा धडा घालून देणारी ठरली आहे. त्यांच्या निधनामुळे कला आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
 
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, स्नेही, मित्र म्हणून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे घट्ट ऋणानुबंध राहीले आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीला नानांच्या रुपाने मराठी मातीतील रांगडा, पण तितकाच संवेदनशील असा अभिनेता मिळाला. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. 'क्रांतिवीर' ते 'नटसम्राट' या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे.
नाना जिथे जात तिथे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, स्वभावाचा भारदस्तपणा वातावरण भारून टाकत. नानांचे अस्तित्त्व त्या परिसराला व्यापून टाकत असे. नाना सर्वांशीच हक्काने आणि वडिलकीच्या, मार्गदर्शकाच्या नात्यानं बोलत असत. त्यामध्ये आत-बाहेर असा भाव नसे. त्यामुळे त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधता येत असे. 
 
परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरेजी आणि त्यांनी सोबत येत 'नाम फाऊंडेशन'ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले.
 
 शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पाटेकर कुटुंबियांच्या, नानांच्या चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
 
___________________________________
 
🌑ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय कलाविश्व आणि समाजकारणाची मोठी हानी : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार 
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड, दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने मराठी तसेच भारतीय कलाविश्वाने एक हरहुन्नरी आणि संवेदनशील कलाकार गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.  
 
   ​आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, "नाना पाटेकर हे केवळ एक उत्कृष्ट अभिनेते नव्हते, तर अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने त्यांनी अनेक व्यक्तिरेखा अजरामर केल्या. 'नटसम्राट', 'क्रांतिवीर', 'परिंदा' यांसारख्या कलाकृतींमधून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर उमटवलेली अमीट छाप रसिकप्रेक्षकांच्या मनात सदैव कायम राहील."  
 
 ​नाना पाटेकर आणि पवार कुटुंबातील आपुलकीच्या संबंधांचा उल्लेख करताना त्या भावूक झाल्या. "नानांचे आदरणीय अजितदादांशी अतिशय जिव्हाळ्याचे, आपुलकीचे आणि स्नेहाचे संबंध होते. कौटुंबिक सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात ते नेहमी पाठीशी उभे राहिले. त्यामुळे त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी ही माझ्यासाठी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत वैयक्तिक आणि विशेष दुःखद आहे," असे त्या म्हणाल्या.
 
 "अभिनयातील यशाच्या शिखरावर असतानाही नानांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचे भान कधीही सुटू दिले नाही. 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून त्यांनी समाजातील वंचित घटक, दुष्काळग्रस्त आणि शेतकरी बांधवांसाठी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी राहील.कलेचा आणि सामाजिक सेवेचा ध्यास घेतलेल्या या अष्टपैलू, संवेदनशील कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली," अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
   
______________________________________         
 
🌑 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नानांचे काम कायम स्मरणात : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
 
मुंबई : रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत प्रत्येक बाबतीत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणाऱ्या व प्रखर सामाजिक जाणिवा जपणाऱ्या नाना पाटेकर यांचे अकल्पित निधन हा चित्रपटसृष्टीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे. गेल्याच आठवड्यात अनंत चतुर्थीच्या दिवशी नानांच्या पुण्याच्या घरी गणपती दर्शनाच्या वेळेस झालेली भेट ही शेवटची ठरली, अशी शोकभावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करताना नानांच्या आठवणींना उजाळा दिला.
 
उपमुख्यमंत्री शिंदे आपल्या शोकसंदेशात म्हणाले, नाना पाटेकर हे अभिनयाची एक जिवंत शाळा होते. 'नटसम्राट' चित्रपटातील त्यांचे संवाद आजही प्रेक्षकांच्या कानात घुमतात. चित्रपटाच्या पडद्यावर ते जितके भारदस्त असायचे, तितकेच खऱ्या आयुष्यात ते अत्यंत साधे आणि जमिनीवर असणारे व्यक्ती होते.
 
नाना पाटेकर यांनी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी आणि दुष्काळग्रस्त कुटुंबांसाठी केलेले काम विशेष उल्लेखनीय आहे. संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. समाजातील सामान्य माणसाशी त्यांची नाळ कायम जोडलेली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल त्यांना असलेली तळमळ आणि मदतीसाठी त्यांनी केलेले काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.
 
नाना पाटेकर यांच्यासोबतच्या वैयक्तिक आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पुण्यातील त्यांच्या घरी गणपती दर्शनाला मी दरवर्षी जायचो. नानांचे आदरातिथ्य मनमिळाऊ स्वभाव जवळून अनुभवता यायचा. त्यांच्याशी गप्पा मारणे आणि त्यांचे मार्गदर्शन घेणे हा नेहमीच एक सुखद अनुभव राहिला आहे. आमच्या दरे येथील निवासस्थानी नानांनी भेट दिली होती शेतीची पाहणी केली गाळ उपसण्याच्या कामासाठी देखील ते आले होते. खासगी भेटीत ते माझ्या पाठीवर हात ठेवून "काय क्रांतिवीर..." अशी त्यांनी दिलेली साद आणि ती कौतुकाची थाप मी कधीच विसरू शकत नाही. त्या शब्दांनी जनतेसाठी अधिक काम करण्याची ऊर्जा दिली, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी नानांच्या आठवणींना उजाळा दिला.
 
आपल्या कलेचा उपयोग समाजासाठी करणारे ते एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. रंगभूमी, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली. ‘नटसम्राट’सारख्या भूमिकेतून त्यांनी अभिनयाची ताकद दाखवून दिली. नाना पाटेकर यांनी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान आणि त्यांचे सामाजिक कार्य नव्या पिढीला नेहमीच प्रेरणा देत राहील. 
नाना पाटेकर हे केवळ उत्तम अभिनेते नव्हते, तर त्यांच्या अभिनयातील सहजता, आवाजातील ताकद आणि भूमिकेत पूर्णपणे झोकून देण्याची वृत्ती कायम स्मरणात राहील. 
 
नानांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या अभिनयाने आणि सामाजिक कार्याने त्यांनी निर्माण केलेले स्थान कायम राहील. 
 
महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला आहे. मी एक सच्चा, दिलदार मित्र गमावला आहे. ही हानी कधीही भरून न येणारी आहे. त्यांच्यासारखा अभिनेता शतकातून एकदाच जन्माला येतो. काश्मीरमधील मुलांसाठी शाळा सुरू करण्याचं त्यांचं अखेरचं स्वप्न होतं, ते पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. तीच नाना पाटेकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल. नानांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes