हर घर तिरंगा 2026 अभियान : राष्ट्रध्वज फडकविताना ध्वज संहितेचे पालन करा
schedule11 Aug 26 person by visibility 122 categoryराज्य
कोल्हापूर : भारत सरकारच्या हर घर तिरंगा 2026 अभियानाच्या अनुषंगाने नागरिक, खासगी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध आस्थापनांनी राष्ट्रध्वज फडकविताना भारतीय ध्वज संहितेतील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत खालील बाबी सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहेत.
हर घर तिरंगा 2026 अभियानाचा कालावधी 9 ते 17 ऑगस्ट असा आहे. या कालावधीत नागरिक, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध आस्थापनांना अभियानाच्या कालावधीतील कोणत्याही दिवशी राष्ट्रध्वज फडकविता येईल. तथापि, राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा, सन्मान व पावित्र्य अबाधित राहील, याची विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.
केंद्र शासनाने जुलै 2022 मध्ये भारतीय ध्वज संहितेत केलेल्या सुधारणेनुसार, खुल्या जागेत किंवा नागरिकांच्या घरावर फडकविण्यात आलेला राष्ट्रध्वज दिवस तसेच रात्र अशा दोन्ही वेळेस फडकविता येतो.
वरील तरतुदींनुसार हर घर तिरंगा 2026 अभियानाच्या कालावधीत राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी विशिष्ट दिवस अथवा वेळेचे बंधन नाही. नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार अभियान कालावधीत कोणत्याही दिवशी व कोणत्याही वेळी राष्ट्रध्वज फडकविता येईल. मात्र, राष्ट्रध्वज फडकविताना त्याचा योग्य सन्मान राखणे तसेच भारतीय ध्वज संहितेतील सर्व नियम व तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहायक संचालकांनी दिली आहे.