SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर: महायुतीची अमित शहांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी; पाणी टंचाईवर मंत्री मुश्रीफ यांचे आश्वासनराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोकुळ दूध संघाचे ठराव शक्ती प्रदर्शनाने देणार; मंत्री हसन मुश्रीफ यांची माहितीनूतन इमारतीच्या बांधकामासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही - मंत्री चंद्रकांतदादा पाटीलघरफाळा भरणेसाठी शनिवार व रविवारी महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे सुरुभाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी जल्लोषात साजराकोल्हापूर शहरात १३ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा; धरणातील पाणीसाठा घटल्याने निर्णयडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची सदिच्छा भेटकृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात सामाजिक उपक्रम; पांजरपोळ संस्थेतील मुक्या जनावरांना दिला आधारशिये येथे भाजप युवा मोर्चातर्फे दिव्यांगांना मदतीचा हात; कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमबल्क वेस्ट जनरेटर कार्यशाळेतून घनकचरा व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन

जाहिरात

 

बल्क वेस्ट जनरेटर कार्यशाळेतून घनकचरा व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन

schedule12 Jun 26 person by visibility 109 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने बल्क वेस्ट जनरेटर (BWG) संदर्भात जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती ताराराणी सभागृह येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत हॉटेल, हॉस्टेल, रुग्णालये, गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक संकुले तसेच विविध आस्थापनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

या कार्यशाळेमध्ये बल्क वेस्ट जनरेटर संस्थांनी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. तसेच ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया करणे, सुका, सॅनिटरी व विशेष काळजी कचऱ्याचे स्वतंत्र व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली. ऑन-साईट प्रक्रिया शक्य नसल्यास महानगरपालिकेकडून आवश्यक सवलत व प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

यावेळी उपआयुक्त परितोष कंकाळ यांनी सादरीकरणाद्वारे बल्क वेस्ट जनरेटरसंदर्भातील नियम व जबाबदाऱ्यांची सविस्तर माहिती दिली. शहरातील प्रतिदिन 100 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या संस्था, 40 हजार लिटरपेक्षा अधिक पाणी वापरणाऱ्या आस्थापना तसेच 5 हजार चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या इमारतींना स्वतःच्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्टिंग करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महिला व मुलींच्या वसतिगृहांना सॅनिटरी कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी पिवळ्या रंगाच्या डस्टबिनचे वाटप करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी कचऱ्याचे चार प्रकारांत वर्गीकरण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. संबंधित संस्थांनी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करावी तसेच 100 हून अधिक नागरिकांच्या उपस्थितीतील कार्यक्रमांची माहिती किमान तीन दिवस अगोदर महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकांना देणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी घनकचरा व्यवस्थापन नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. हॉटेल, हॉस्पिटल व मुलींच्या वसतिगृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाटीसाठी पिवळ्या डस्टबिनचा वापर करावा तसेच सुका कचरा संकलनासाठी स्वतंत्र दिवस निश्चित करण्याची सूचना केली. घरगुती कचरा योग्य पद्धतीने वर्गीकृत करूनच घंटागाडीकडे सुपूर्द करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी नमस्ते योजनेअंतर्गत कचरा वेचकांना ओळखपत्र, रेनकोट व मास्क उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या कार्यशाळेस मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, शहर समन्वयक हेमंत काशीद, मेघराज चडचणकर, सर्व आरोग्य निरीक्षक, कोल्हापूर हॉटेल मालक संघटनेचे पदाधिकारी, कॅटरिंग असोसिएशनचे प्रतिनिधी, हॉस्पिटल व हॉस्टेल व्यवस्थापक, हाउसिंग सोसायटी सदस्य तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे, स्वच्छता उपक्रमांना गती देणे तसेच पर्यावरणपूरक व शाश्वत शहर उभारणीसाठी या कार्यशाळेत सहभागी संस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes