माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांचा सन्मान; 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
schedule29 Jul 26 person by visibility 176 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा तसेच त्यांच्या पाल्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी धनराशी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज व आवश्यक कागदपत्रे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, नृत्य, वादन आदी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजक, संगणक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे तसेच पूर, जळीत, दरोडा, अपघात व इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी सैनिक व माजी सैनिक विधवांचा सन्मान करण्यात येणार आहे.
याशिवाय, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १० वीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक व १२ वीमध्ये ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे माजी सैनिक किंवा माजी सैनिक विधवांचे पाल्य तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी अथवा पाल्य यांचाही गौरव केला जाणार आहे.
इच्छुकांनी संबंधित कार्याची प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, सैन्य सेवा पुस्तक तसेच माजी सैनिक किंवा माजी सैनिक विधवा ओळखपत्रासह अर्ज १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत स्वतः उपस्थित राहून सादर करावेत. अर्ज पोस्टाने स्वीकारले जाणार नाहीत.
अधिक माहितीसाठी ०२३१-२६६५८१२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (डॉ.) भिमसेन चवदार (नि.) यांनी केले.