कोल्हापुरात महापालिकेविरोधात 'बोंबमारो'चा कडकडाट; अमृत २.० च्या रखडलेल्या कामावरून भारतीय दलित महासंघ रस्त्यावर
schedule09 Apr 26 person by visibility 298 categoryसामाजिक
कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रातील शाहू मार्केट यार्ड परिसरात अमृत २.० योजनेअंतर्गत सुरू असलेली ड्रेनेज आणि रस्त्यांची कामे रखडल्याच्या निषेधार्थ भारतीय दलित महासंघाच्या वतीने आज महापालिका कार्यालयासमोर निदर्शनात्मक बोंबमारो आक्रोश आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन भारतीय दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरज अवघडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून या परिसरातील कामे अत्यंत संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.
आर अँड बी इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीने जानेवारी अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते, मात्र या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. या अपूर्ण कामांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ आणि प्रदूषणाची समस्या निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे.
मार्केट यार्ड हा परिसर वर्दळीचा असल्याने अपूर्ण रस्ते आणि उघड्या ड्रेनेजमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. पावसाळा तोंडावर आला असतानाही कामाची गती न वाढल्याने आगामी काळात येथील रहिवाशांना आणि व्यापाऱ्यांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आंदोलकांनी व्यक्त केली. संबंधित ठेकेदार आणि महापालिकेचे जबाबदार अधिकारी यांच्या संगनमतामुळेच जनतेच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व प्रलंबित कामे पूर्ण करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून मागण्या पूर्ण न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र लढा उभारण्याचा इशारा दलित महासंघाने दिला आहे.