भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 15 जुलैपर्यंत अर्ज करावेत
schedule22 Jun 26 person by visibility 141 categoryराज्य
कोल्हापूर : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील इ.११वी, १२ वी तसेच इ. १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहातमध्ये प्रवेश मिळण्याकरीता अर्ज करुन देखील प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. स्वाधार योजना महानगरपालिकेच्या हद्दीतील तसेच हद्दीपासुन ५ कि.मी. परीसरातील व तालुक्याच्या ठिकाणी (तालुका मुख्यालयाच्या हद्दीतील) असलेल्या महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थी/विद्यार्थीनींसाठी राबविण्यात येत आहे. जिल्ह्यामधील महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 15 जुलैपर्यंत https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे अवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
उपरोक्त अभ्यासक्रमामधील पात्र विद्यार्थ्यांनी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात सुधारित शासन निर्णयानुसार स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या महाविद्यालयाच्या नजिकच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी https://hmasnew.mahait.org या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता कनिष्ठ महाविद्यालय (११वी व १२वी) तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी १५ जुलै पर्यंत अर्ज सादर करता येईल. त्यानंतर गुणवत्तेनुसार अथवा जागा रिक्त नसल्याने विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास विद्यायार्थ्यास स्वाधार योजनेचा लाभ मिळेल. जे विद्यार्थी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणार नाहीत, त्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच चालु शैक्षणिक वर्षापासुन स्वाधार योजनेस थेट अर्ज करता येणार नाही. तसेच ज्या तालुक्याच्या ठिकाणी मुलांचे अथवा मुलींचे शासकीस वसतीगृह नसेल त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी अथवा विद्यार्थीनींसाठी हा नियम शिथिल असेल.