सहकार मजबुतीकरणासाठी गोकुळला सर्वतोपरी सहकार्य : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
schedule17 Jul 25 person by visibility 421 categoryउद्योग

कोल्हापूर : सहकार व दुग्ध व्यवसाय क्षेत्रात गोकुळ सारख्या संस्थेचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. ते अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालय मार्फत आवश्यक ते सहकार्य गोकुळला भविष्यात केले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी पुणे येथे केले.
स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी चषक पुणे लिग कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री मोहोळ बोलत होते. यावेळी नविद मुश्रीफ यांची गोकुळच्या चेअरमनपदी निवड झालेबद्द्ल मंत्री मोहोळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री मुश्रीफ यांनी गोकुळच्या कामकाजाची माहिती दिली व मंत्री महोदयांना गोकुळच्या भेटीसाठी निमंत्रण दिले.
यावेळी बोलताना मंत्री मोहोळ म्हणाले, दूध, आरोग्य आणि खेळाडू याचा परस्परसंबंध अधोरेखित करत खेळाडूंनी शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दुधासारखा गुणवत्तापूर्ण सकस आहार घ्यावा व युवकांनी, विद्यार्थ्यांनी आणि क्रीडापटूंनी त्याचा नियमित वापर करावा. सहकार, आरोग्य आणि युवक या तिन्ही क्षेत्रांच्या विकासाठी गोकुळ सारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा.
यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ हा महाराष्ट्राचा ब्रँड असून खेळाडू, महिला व युवकांसाठी दर्जेदार दूध आणि दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करून देण्याचे आमचे वचन आहे. गोकुळचे दूध हे केवळ दर्जेदारच नाही तर नैसर्गिक पोषणमूल्यांनी भरलेलं आहे. आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक खेळाडूंना गोकुळ दूधाचा लाभ मिळावा. केंद्र सरकारकडून सहकार्याची ग्वाही मिळाल्याने अशा उपक्रमांना चालना मिळेल.
ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित नसून, तरुणांना व्यासपीठ, शिस्त आणि संघभावना देणारा एक उपक्रम आहे. या कार्यक्रमात क्रीडाप्रेमींसोबत स्थानिक सहकारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक बाबुराव चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँगेसचे शहर अध्यक्ष समीर चांदेरे व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर यांनी केले होते.
यावेळी सुभाष जगताप, प्रमोद भानगिरे, सुनिल चांदेरे, नासिर सय्यद, अर्जुन शिंदे, माणिक गांधीले, सोमनाथ धनकुडे, आप्पासाहेब दळवी, विश्वनाथ पाटोळे, नंदकुमार जाधव, रामदास धनकुडे, संतोष भुजबळ, रामदास चाळणकर, किरण चांदेरे व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.