गोकुळचे माजी संचालक सत्यजीत पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीरच्या राजकारणात नवा ट्विस्ट
schedule29 Sep 26 person by visibility 218 categoryराजकीय
◼️गोकुळचे माजी संचालक आणि बीडचे माजी सरपंच सत्यजीत सुरेशराव पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील युवा नेते, जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी संचालक तथा लोकनियुक्त माजी सरपंच सत्यजीत सुरेशराव पाटील यांनी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या राजकीय प्रवेशामुळे राहुल पाटील यांच्या गटाला खिंडार पडले. यामुळे करवीरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
करवीर तालुक्यातील कसबा बीडचे युवानेते आणि गोकुळ दूध संघाचे माजी संचालक तथा लोकनियुक्त माजी सरपंच सत्यजीत सुरेशराव पाटील यांनी आज राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सत्यजीत पाटील हे स्वर्गीय माजी आमदार पी एन पाटील यांचे खंदे समर्थक स्वर्गीय सुरेश पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे युवा नेतृत्व म्हणून परिसरात कार्यरत आहेत. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्याला काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार सतेज पाटील यांनी सत्यजीत पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशाचे स्वागत केले. स्वर्गीय सुरेश पाटील यांच्याशी असलेल्या जुन्या मैत्रीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. सुरेश पाटील यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा पाया सत्यजीत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. काँग्रेसच्या विचारांवर ठाम राहण्यासाठी संस्कार आणि मजबूत वैचारिक पाया आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. सामान्य नागरिक, शेतकरी, तरुण आणि रोजगाराच्या प्रश्नांवर काँग्रेसची भूमिका असल्याचे सांगत आमदार सतेज पाटील यांनी महागाई, बेरोजगारी आणि शेतीच्या प्रश्नांवरही भाष्य केले. करवीर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या विचारांशी जोडलेला मतदारसंघ आहे. काँग्रेसच्या विचारांशी जोडलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन संघटना अधिक मजबूत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सामान्य माणसाची सेवा करण्याची प्रेरणा काँग्रेसच्या विचारातून मिळते, असे सांगत आगामी काळात स्वर्गीय बोंद्रे दादा आणि स्वर्गीय पी एन पाटील यांच्या मनातील कॉंग्रेस ही पुन्हा उभी करण्याची जबाबदारी सर्वांची असून त्यासाठी सज्ज होवुया असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. गोकुळ टिकला पाहिजेत. म्हणून गोकुळची निवडणूक लढतोय ते साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतोय असे आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले.
माझ्या कॉंग्रेस प्रवेशामुळे करवीर तालुक्याच्या राजकारणात नवीन ट्वीस्ट निर्माण झाला असल्याचे सांगत काँग्रेसच्या विचारांशी जोडून घेत आगामी काळात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याचे सत्यजीत पाटील यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये प्रवेश करताना कोणत्याही वैयक्तिक अपेक्षेपेक्षा विचार आणि नेतृत्वाला महत्त्व दिल्याचे सत्यजीत पाटील यांनी सांगितले. आगामी काळात काँग्रेसच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.
यावेळी एम आर पाटील आणि राहुल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. काँग्रेसची विचारधारा आणि संघटन मजबूत करण्यासाठी सत्यजीत पाटील यांनी करवीरच्या पश्चिम भागात काम केल्याचे सांगत तरुणांची फळी उभी करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाचा त्यांनी उल्लेख केला.
आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या राजकीय प्रवेशामुळे राहुल पाटील यांच्या गटाला खिंडार पडले. यामुळे करवीरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते एकनाथ पाटील, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, उदय पाटील सडोलीकर, करवीर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामकृष्ण पाटील, नगरसेवक विनायक फाळके, राहुल माने, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तायशेटे, गोकुळचे माजी संचालक बाबासो चौगले, बयाजी शेळके, शशिकांत खोत, एम आर पाटील, उदय पाटील, बीडचे सरपंच संतोष मोरे, डॉ के एन पाटील, सुशिल देसाई, गुंडू पाटील, शिवाजी गावडे, हिदायत मुल्ला, श्रीनिवास पाटील, रवींद्र पाटील, प्रताप नाईक, सागर पाटील, भरत रसाळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.