कोल्हापुरात 'केडीएल प्रीमियर लीग' क्रिकेट स्पर्धेचा उद्यापासून थरार; ५०० खेळाडूंचा सहभाग
schedule06 Apr 26 person by visibility 164 categoryक्रीडा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनच्या ६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 'केडीएल प्रीमियर लीग' या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्यापासून शास्त्रीनगर मैदानावर या स्पर्धेला दिमाखात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची सविस्तर माहिती राष्ट्रीय खेळाडू दाऊद पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की, कोल्हापूर शहर आणि उपनगरातील वाहन व्यवसाय तसेच जुनी कार खरेदी-विक्री क्षेत्रातील सुमारे ५०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
स्पर्धेत एकूण १६ संघ उतरले असून यात अण्णा मोटर्स, गवळी मोटर्स, ओम मोटर्स, साई व्हील्स, आय कार्स, युनिक कार्स, श्री मोटर्स, सोना कार्स, स्वामी मोटर्स, शिवानंद मोटर्स, डी मोटर्स, बाबा मोटर्स, प्रगती मोटर्स, एस एम मोटर्स, कोल्हापूर DSA आणि पांजरपोळ या संघांचा समावेश आहे.
७ आणि ८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत शास्त्रीनगर मैदानावर हे सामने रंगणार आहेत.
९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महापौर रूपाराणी निकम व उपमहापौर अक्षय जरग यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना गौरवण्यात येईल.
या पत्रकार परिषदेस रणजी खेळाडू राजेश घोरपडे, अध्यक्ष सुधाकर सासणे, अध्यक्ष विक्रम गवळी, उपाध्यक्ष इमरान मलबारी, सचिव इजाज नागरकट्टी, खजिनदार अभिजीत चित्रागार, अध्यक्ष जमीर सय्यद, इचलकरंजी अध्यक्ष शीतल दत्तवाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वाहन व्यावसायिकांमध्ये खेळाडूवृत्ती वाढावी आणि व्यवसायासोबतच आरोग्य जपले जावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे असोसिएशनतर्फे सांगण्यात आले.