कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांची ‘सिरडॅप’कडून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञपदी निवड
schedule21 May 25 person by visibility 163 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन यांची जगात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या सिरडॅप संस्थेकडून 'आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ' म्हणून निवड करण्यात आली आहे.
सेंटर ऑन इंटेग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट फॉर एशिया अँड पॅसिफिक अर्थात सिरडॅप संस्था आशिया-पॅसिफिक प्रदेशातील ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलनावर लक्ष केंद्रित करणारी एक आंतरसरकारी संस्था आहे. ही संस्था १९७९ मध्ये या प्रदेशातील देशांच्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या पुढाकाराने स्थापन झाली. ग्रामीण विकासाच्या दिशेने धोरण आणि कृतींवर प्रभाव पाडण्यासाठी सिरडॅप संपर्क मंत्रालयांच्या आणि संस्थांना जोडणाऱ्या नेटवर्कसोबत काम करते. ज्ञानप्रसार, विविध धोरणांचे समर्थन आणि संशोधनाद्वारे ग्रामीण समुदायांच्या राहणीमानात सुधारणा करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.
या संस्थेकडून शिक्षण, सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ.प्रथापन यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ.प्रथापन हे उत्तम शिक्षणतज्ज्ञ असून भारत सरकारच्या आयसीएआर, नॅक , युजीसी व इतर समित्यांवर ते मूल्यमापन अधिकारी म्हणून काम पाहतात. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून अनेक शासकीय व निमशासकीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते आजीव सदस्य आहेत.
या निवडीबद्दल बोलताना डॉ.प्रथापन म्हणाले '' सिरडॅप सारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय संस्थेत तज्ज्ञ म्हणून झालेली निवड माझ्यासाठी अनमोल आहे. आई वडील, पद्मश्री डॉ डी वाय पाटीलसाहेब, कुलपती डॉ संजय डी पाटील यांचे आशीर्वाद आणि डी वाय पाटील ग्रुपच्या प्रत्येक घटकाचा या यशात मोठा वाटा आहे. डी.वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ व सिरडॅप यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी प्रयत्नशील राहू. या निवडीमुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. भविष्यात फॉरेन युनिव्हर्सिटी कॉलॅबोरेशन, रिसर्च, पेटंट फाइल्स, व्हॅल्यू ऍडेड कोर्सेस, व अन्य महत्वाच्या कोर्सेस वर भर देऊन विद्यापीठाचा नावलौकिक आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न करू.
या निवडीबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलसचिव प्रा. डॉ जयेंद्र खोत यांनी डॉ. प्रथापन यांचे अभिनंदन केले आहे.