तुमच्या सगळ्यांच्या मनात जे आहे ते येत्या कालावधीत पूर्ण करू; पी एन पाटील गटाच्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांचा 'शब्द'
schedule26 Aug 25 person by visibility 318 categoryराजकीय

▪️पी. एन. पाटील गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; जोरदार शक्तीप्रदर्शन
कोल्हापूर : राहुल व राजेश यांनी ज्या विश्वासाने पक्षात प्रवेश केला, त्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे. त्यांना या निर्णयाची चूक वाटणार नाही, याची खात्री देत असतानाच तुमच्या सगळ्यांच्या मनात जे आहे ते येत्या कालावधीत पूर्ण करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली
सडोली खालसा (ता. करवीर) येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व जिल्हा बँकचे संचालक राजेश पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाटील बंधूनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले हे राज्य सर्वसामान्य जनतेचं आहे; त्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू आहेत आणि पुढेही सुरू राहतील. भावाच्या नात्यानं लाडक्या बहिणींच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून योग्य निर्णय घेतले जाताहेत आणि आवश्यक ते अनुदानही दिलं जात आहे. शेतकऱ्यांना सोलारवर वीज देण्यासाठी ७५ टक्के अनुदान आम्ही उपलब्ध करून देत आहोत.
तसेच आजचा दिवस ऐतिहासिक आहे. दिवंगत आमदार स्व. पी. एन. पाटील यांच्या राजकीय तालमीत घडलेले कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत, ही अतिशय समाधानाची बाब आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, 'पी. एन.' व मी जिल्ह्यात दीर्घकाळ काम केले. त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यांना कायमच सन्मानाची वागणूक दिली जाईल. आगामी काळात सर्वच निवडणुकीत आमच्यासमोर कोणीही टिकाव धरणार नाही.
जि.प.चे माजी अध्यक्ष राहुल पाटील म्हणाले, 'पी. एन. पाटील यांनी आयुष्यभर काँग्रेसची विचारधारा जपली. मात्र त्यांच्या निधनानंतर काँग्रेसच्या वरिष्ठांना सांत्वनाला वेळ मिळाला नाही. पवार कुटुंबांशी आमचे तीन पिढ्यांचे नाते आहे. 'भोगावती'चे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी स्वागत केले. 'गोकुळ'चे संचालक बाळासाहेब खाडे यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार के. पी. पाटील, 'गोकुळ'चे अध्यक्ष नविद मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, मानसिंगराव गायकवाड, अरुण डोंगळे, आदिल फरास, भय्या माने, मधुकर जांभळे, पी. डी. धुंदरे, आदी उपस्थित होते