प्रख्यात हिंदी कवयित्री गगन गिल यांची शिवाजी विद्यापीठास सदिच्छा भेट
schedule26 Aug 25 person by visibility 223 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रख्यात हिंदी साहित्यिक, कवयित्री गगन गिल यांनी आज शिवाजी विद्यापीठास सदिच्छा भेट दिली.
श्रीमती गिल या एका साहित्यिक कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच कोल्हापूरला आल्या आहेत. आज त्यांनी शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांची भेट घेतली. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाकडून प्रकाशित ‘ऐसे थे हमारे शाहू महाराज’ या पुस्तकाची प्रत देऊन त्यांचे स्वागत केले. श्रीमती गिल यांनी विद्यापीठासह कोल्हापुरातील साहित्यिक चळवळीविषयी जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. हिंदी अधिविभागालाही त्यांनी सदिच्छा भेट देऊन तेथील शिक्षक-विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधला. तेथेही त्यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठ परिसरात फिरून येथील जलसंवर्धन कामाची पाहणीही त्यांनी केली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार-संपादक डॉ. विजय चोरमारे यांच्यासह प्रख्यात कवयित्री संजीवनी तडेगावकर, हिंदी अधिविभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. प्रकाश मुंज, डॉ. जयसिंग कांबळे, डॉ. संतोष कोळेकर, डॉ. गीता दोडमणी, डॉ. सुषमा चौगुले, डॉ. प्रकाश निकम यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.