बाप्पांच्या स्वागताला भक्त सज्ज; बाजारपेठेत खरेदीला उधाण, कार्यकर्ते उत्साहात
schedule25 Aug 25 person by visibility 194 categoryसामाजिक

कोल्हापूर : गणेशोत्सवाला आता फक्त दोन दिवस राहिल्याने कोल्हापूरकर लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी सज्ज होत आहे. प्रत्येक गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी आरासासाठी तयारीत गुंतला आहे. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीला उधाण आले आहे. तरुण मंडळाचे मंडप सजले असून गणेशाच्या आगमनाची तयारी जोरात सुरू आहे.
गणपतीच्या आगमनासाठी घराघरांमध्ये आता स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. आरासाच्या साहित्यांची जुळवाजुळव केली जात आहे.
गणेशचतुर्थीच्या दोन दिवस आधीच घराघरांमध्ये आरास केली जाते. त्यासाठी बाजारपेठेत सॅटिनच्या फुलांच्या आकर्षक माळा, झुरमुळ्या, झुंबर, वेली, कृत्रिम फुलं, पाने, गवत, झेंडूसह वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या माळा असे अनेकविध सुंदर साहित्य बाजारपेठेत आले आहेत. त्या साहित्यांच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी महाद्वार रोड, पापाची तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, कटलरी मार्केट, राजारामपूरी येथे मोठी गर्दी केली आहे
भक्तांच्या हातात त्यांचा लाडका देव देण्यासाठी कुंभारवाडे रात्रभर जागू लागले आहे. कुंभार गल्ली, गंगावेश, बापट कॅम्प या कुंभार गल्ल्यांमध्ये अख्खे कुटुंब गणेशमूर्तीचे रंगकाम करण्यात गुंतले आहेत. कोणी रंगकाम करतंय, कोणी डोळे रेखाटतंय, कोणी फेटा, आर्टिफिशिअल दागिने, खड्यांचे नक्षीकाम अशा सजावटीने गणेशाचे रूप आणखी खुलले जात आहेत. तसेच तरुण मंडळांच्या मोठ्या गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी तयार असून तरुण मंडळाचे मोठमोठे मंडप मोठ्या प्रमाणात सजावटीद्वारे बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज आहेत प्रतीक्षा आहेत ती फक्त बाप्पाच्या आगमनाची.