म्हैस दूध वाढीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन : नविद मुश्रीफ; हातकणंगले तालुका संपर्क सभा खेळीमेळीत
schedule23 Aug 25 person by visibility 240 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) संलग्न हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक दूध संस्थांची संपर्क सभा दि.२१ आक्टोबर रोजी स्वप्नपूर्ती मंगल कार्यालय, अतिग्रे येथे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे तसेच संचालक मंडळ व मान्यवरांच्या उपस्थित पार पडली.
या सभेत बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, गोकुळच्या म्हैस दुधाला शहरी भागात मोठी मागणी असून दूध संकलन वाढवण्यासाठी उत्पादक व दूध संस्था यांनी सामुदायिकपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले. मुश्रीफ पुढे म्हणाले, संस्थापक स्व. आनंदराव चुयेकर साहेबांनी गोकुळची स्थापना केली यामागे हेतू हाच होता की शहरातील पैसा ग्रामीण भागात दुधाच्या माध्यमातून पोहोचावा. आज त्याच ध्येयाने गोकुळच्या ठेवी तब्बल ५१२ कोटींवर पोहोचल्या आहेत. संघाने २५ लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी विविध योजना राबविल्या आहेत. म्हैस खरेदी अनुदान ५० हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच टी.एम.आर.च्या माध्यमातून सुका चारा उपलब्ध करून दिला जात आहे. गोकुळची ध्येयधोरणे शाश्वत असून, संघ नेहमीच उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे आश्वासन चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिले.
यावेळी उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळाचे अभिनंदन ठरावाने करण्यात आले. तसेच किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत सभासदांच्या वारसांना व मृत जनावरांच्या मालकांना विमा धनादेशांचे वाटपही करण्यात आले. यावेळी जय हनुमान सह.दूध संस्था मौ.वडगाव, समर्थ सह.दूध संस्था चावरे, हनुमान सह.दूध संस्था मनपाडळे, इंडिया सह.दूध संस्था बिरदेववाडी आदि संस्था प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले तसेच विविध सूचनाची नोंद घेण्यात आली.
यावेळी संघाचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील,अरुण डोंगळे, संचालक मुरलीधर जाधव यांनी सभेस मार्गदर्शन केले. स्वागत व प्रस्ताविक संचालक डॉ.सुजित मिणचेकर तर आभार संचालिका शौमिका महाडिक यांनी मानले.
याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, रणजितसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी, दूध संस्था कर्मचारी संघटना प्रतिनिधी तसेच हातकणंगले तालुक्यातील दूध संस्थाचे चेअरमन, संचालक, प्रतिनिधी, दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.