डॉ. संजय पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा मंत्री राणें- सरनाईक यांच्याकडून 'महाराष्ट्र गौरव' ने सन्मान; नवभारत महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव्हमध्ये गौरव
schedule23 Aug 25 person by visibility 306 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : उच्चशिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांचा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याहस्ते 'महाराष्ट्र गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'नवभारत'तर्फे आयोजित महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव्हमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील ताज प्रेसिडेंट येथे 'महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव्ह' आयोजित करण्यात आली होती. यावेळी ‘नवभारत’चे व्यवस्थापकीय संचालक वैभव माहेश्वरी, डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या परिषदेत संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र भारतात अग्रस्थानी आहे. मात्र, राज्यातील शिक्षण क्षेत्राचा अजूनही वेगवान विकास होणे गरजेचे आहे. उच्च शिक्षणासाठी भारताबाहेर जाणारे विद्यार्थी राज्यातच शिकतील अशा प्रकारचे शिक्षण राज्यातच उपलब्ध यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर आमचा भर राहील. त्याचबरोबर पॉलिसी बेस्ट इंडस्ट्रीलायझेशन करण्यावरही सरकारचा भर राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
विविध क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण कल्पना राबवून त्या कृतीत उतरणारे व त्यायोगे राज्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देणाऱ्या मान्यवरांना यावेळी 'महाराष्ट्र गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि उच्च शिक्षणातील अतुलनीय योगदानाबद्दल डॉ. संजय डी. पाटील यांचा यावेळी विशेष पुरस्कार देऊन मंत्री प्रताप सरनाईक व मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर, डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे (कोल्हापूर) आणि डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, आकुर्डी (पुणे) या तीन विद्यापीठांचे कुलपती आणि डी. वाय. पाटील समुहाचे अध्यक्ष म्हणून डॉ. संजय डी. पाटील कार्यरत आहेत. डॉ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली के.जी. ते पी.जी. पर्यंत शिक्षण देणाऱ्या ४८ संस्था ज्ञानदानाचे काम करत आहेत. या संस्थांमध्ये ४३ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
समूहाच्या विविध संस्थांमार्फत मेडिकल, अभियांत्रिकी, आर्कीटेक्चर, पॉलिटेक्निक, नर्सिंग, फार्मसी, कृषी, कृषी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, हेल्थ सायन्स, हॉस्पिटलिटी अशा विविध क्षेत्रात उच्च शिक्षण दिले जाते. शिक्षित पिढी घडवून राज्याच्या विकासात दिलेल्या असीम योगदानाबद्दल डॉ. संजय डी. पाटील यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.