कसबा बोरगाव येथे पोहताना धरण परिसरामध्ये तरुण बुडाला; १० तास उलटूनही शोध नाही
schedule27 Sep 26 person by visibility 184 categoryगुन्हे
पन्हाळा: तालुक्यातील कसबा बोरगाव येथील कासारी नदीवरील बोरगाव पोहाळे धरण परिसरात पोहण्यासाठी गेलेला ३२ वर्षीय विकास विठ्ठल चौगुले हा तरुण पाण्यात बुडाला. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता.
विकास हा गोकुळ दूध संघात नोकरीला होता. नेहमीप्रमाणे तो रविवारी सकाळी धरण परिसरात पोहण्यासाठी गेला होता. पोहताना अचानक दम लागल्याने त्याने मदतीसाठी आरडाओरड केला.
नदीवरील घोटवडे येथील दोन तरुणांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली, मात्र प्रयत्न करताना ते दोघेही पाण्याच्या भोऱ्यात अडकले. सुदैवाने त्यांनी कसातरी किनारा गाठून आपला जीव वाचवला, परंतु विकासचा थांगपत्ता लागला नाही.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सहकार्याने तब्बल १० तास नदीपात्रात शोध मोहीम राबवण्यात आली, पण सायंकाळपर्यंत त्याचा पत्ता लागला नाही. अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली. विकास हा चार बहिणींनंतर आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता, या दुर्घटनेमुळे कुटुंबावर व गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.