गर्दीचा फायदा घेऊन सोन्याची गंठण चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील महिलेस अटक
schedule18 Nov 26 person by visibility 176 categoryगुन्हे
कोल्हापूर : इचलकरंजी एसटी स्टँडवर प्रवाशांची होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या पर्समधील सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या एका रेकॉर्डवरील महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. तिच्याकडून तब्बल ५ लाख ८२ हजार ९६६ रुपये किमतीचे ४१.९४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण हस्तगत करण्यात आले आहे. सपना वैभव कदम (वय ३२, रा. शामनगर हाऊसिंग सोसायटी, विरयनगर, कुपवाड, जि. सांगली, सध्या रा. शिवाजी चौक, हातकणंगले) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी महिला दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास इचलकरंजी एसटी स्टँडवरून हातकणंगले जाणाऱ्या एसटी बसमध्ये गर्दीतून चढत होती. यावेळी अज्ञात चोराने गर्दीचा गैरफायदा घेऊन फिर्यादीच्या पर्सच्या छोट्या कप्प्यात ठेवलेले सुमारे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण परस्पर चोरी केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सपोनि जालिंदर जाधव व पथकाची नेमणूक केली.
तपासादरम्यान पोलीस अंमलदार राजु कोरे, युवराज पाटील आणि शुभम संकपाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, हा गुन्हा रेकॉर्डवरील महिला आरोपी सपना कदम हिने केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी महिला चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी तारदाळ फाटा, हातकणंगले येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता तिने गुन्हा केल्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीला गेलेले ५ लाख ८२ हजार ९६६ रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले असून, पुढील तपासासाठी आरोपी व मुद्देमाल शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक जयश्री पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली आहे.