३१ ऑक्टोबरपर्यंत थकीत मुद्दल न भरल्यास ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा खंडित करणार
schedule17 Oct 26 person by visibility 276 categoryमहानगरपालिका
◼️आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचा इशारा; ११ ग्रामपंचायतींकडे ८ कोटी ८० लाखांची थकबाकी
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या शहरालगतच्या ग्रामपंचायतींकडे पाणीपट्टीपोटी मुद्दल व विलंब आकारासह एकूण ८ कोटी ८० लाख ६३ हजार ४११ रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये २ कोटी २१ लाख ९१ हजार २५६ रुपये मुद्दल आणि ६ कोटी ५८ लाख ७२ हजार १५५ रुपये विलंब आकाराचा समावेश आहे. ग्रामपंचायतींनी ३१ ऑक्टोबरपर्यंत 50 टक्के थकीत मुद्दल रकमेचा भरणा न केल्यास संबंधित ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज दिला. तसेच 25 टक्के रक्कम डिसेंबर अखेर व उर्वरीत 25 टक्के रक्कम मार्च अखेर भरण्याच्या सूचना केल्या.
महानगरपालिकेच्या थकीत पाणीपट्टी वसुलीबाबत आयुक्त कार्यालयात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) आणि ग्रामपंचायतींच्या विस्तार अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी थकबाकी वसुलीचा आढावा घेत ग्रामपंचायतींना थकीत रक्कम भरण्याचे निर्देश दिले.
आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड म्हणाले, महानगरपालिकेची ग्रामपंचायतींकडील थकबाकी गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित आहे. ग्रामपंचायतींकडून मार्चअखेर काही रक्कम भरली जाते. मात्र ही रक्कम प्रामुख्याने विलंब आकारामध्ये जमा होत असल्याने मूळ थकबाकी कायम राहत आहे. त्यामुळे यंदा सर्व ग्रामपंचायतींनी थकीत मुद्दल रक्कम प्राधान्याने भरून थकबाकी कमी करण्यासाठी नियोजन करावे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठ्यासाठी प्रतिहजार लिटर २३ ते २४ रुपये दराने पाणी ग्रामपंचायत घेते. मात्र महानगरपालिका प्रतिहजार लिटर १५ रुपये दराने आकारणी करत असतानाही ग्रामपंचायतींकडून थकबाकी भरली जात नाही.
महापालिकेला पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीजबिल, देखभाल-दुरुस्ती आणि पाटबंधारे विभागाचे पाणीबिल नियमित भरावे लागते. त्यामुळे ग्रामपंचायतींनीही आपली जबाबदारी ओळखून पाणीपट्टीची वसुली करून महानगरपालिकेकडे रक्कम जमा करावी.
पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आगामी काळात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी थकबाकी वसुली आवश्यक आहे. ग्रामपंचायतींच्या विस्तार अधिकाऱ्यांनी संबंधित गावांमध्ये बैठक घेऊन मुद्दल रक्कम भरण्याचे नियोजन करावे. तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील अनधिकृत नळजोडण्या रोखून संबंधितांवर कारवाई करावी असे निर्देशही आयुक्तांनी दिले.
महानगरपालिका शहरामध्ये थकबाकी वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवत आहे. त्यामुळे शहरातील नागरिक आणि ग्रामपंचायती यांच्यासाठी वेगवेगळे निकष लागू केले जाणार नाहीत. १ नोव्हेंबर २०२६ पासून ग्रामपंचायतींकडील थकबाकी वसुलीसाठीही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. मुद्दलावरील विलंब आकाराच्या रकमेत सवलत देण्याबाबत महासभेच्या समोर निर्णयासाठी ठेवण्यात येईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे किमान मुद्दल तरी ऑक्टोंबर अखेर 50 टक्के, डिसेंबर अखेर 25 टक्के व मार्च अखेर 25 टक्के अशा तीन टप्यात भरावी अशा सूचना केल्या.
गांधीनगर ग्रामपंचायतीकडे सर्वाधिक थकबाकी
ग्रामपंचायतीनिहाय थकबाकीमध्ये गांधीनगर ग्रामपंचायतीकडे ३ कोटी ३३ लाख ८४ हजार ६८६ रुपये, हणमंतवाडीकडे १ कोटी १८ लाख ८८ हजार १५५ रुपये, शिंगणापूरकडे ८२ लाख ८९ हजार ४४ रुपये, कळंबा ग्रामपंचायतीकडे ७७ लाख ६२ हजार ५७० रुपये, वळिवडेकडे ६० लाख ८३ हजार ५०३ रुपये आणि गडमुडशिंगीकडे ५५ लाख ७६ हजार ३८० रुपये थकबाकी आहे. तसेच बालिंगा ग्रामपंचायतीकडे ४७ लाख ४७ हजार ६७२ रुपये, उंचगावकडे ४५ लाख ४६ हजार ९०१ रुपये, नागदेववाडीकडे ४४ लाख ३५ हजार ७३२ रुपये, सरनोबतवाडीकडे ८ लाख ७६ हजार ३२० रुपये, चिंचवाडकडे २ लाख ६७ हजार ६२३ रुपये आणि व्यंकटेश कॉलनी-वळिवडे ग्रामपंचायतीकडे थकबाकी असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली
या बैठकीस उपआयुक्त नागेंद्र मुतकेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) जयवंत उगले, जल अभियंता जयेश जाधव, सरनोबतवाडीचे ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय धनगर, गांधीनगरचे विजय पाटील, गडमुडशिंगीचे अजित जगताप, कळंबे तर्फे ठाणेचे विलास राबाडे, बालिंगाचे चंदन चव्हाण, हणमंतवाडीचे डी. व्ही. तेलवी, उंचगावचे आर. एन. गाढवे, वडणगेचे राजेंद्र भगत, नागदेववाडीचे रमेश कारंडे, करवीरचे उपअभियंता डी. एस. पाटील आणि शाखा अभियंता आर. पी. भोंगाळे उपस्थित होते.