चंबुखडी व पुईखडी येथील थकबाकीदार अपार्टमेंटचे पाणीपुरवठा कनेक्शन खंडित
schedule10 Feb 26 person by visibility 87 categoryमहानगरपालिका
🔹️8 हजार मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकतींवर बोजा नोंद करण्याच्या नोटीसा
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका शहर पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाच्या वसुली पथकाकडून थकबाकीदार नळ कनेक्शनधारकांवर कारवाई करण्यात आली. चंबुखडी येथील चौगुले सावंत बिल्डर्स यांच्याकडे 6.50 लाख रुपये तसेच पुईखडी येथील स्वप्नपुर्ती अपार्टमेंट यांच्याकडे 6.00 लाख रुपयांची थकबाकी असल्याने आज या दोन्ही अपार्टमेंटचे पाणीपुरवठ्याचे कनेक्शन खंडित करण्यात आले. त्याचप्रमाणे ज्या कनेक्शन धारकाची थकबाकी रु.20 हजार पेक्षा जास्त आहे. अशा सुमारे 8 हजार थकबाकीदारांना शहर पाणी पुरवठा विभागामार्फत थकबाकीच्या नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 481 (1) व (2) मधील तरतूदीनुसार संबंधित थकबाकींच्या मिळकतीवरती बोजा नोंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
महानगरपालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांनी सोमवारी शहर पाणीपुरवठा विभागाची वसुली आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त परितोष कंकाळ, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपजल अभियंता रावसाहेब चव्हाण, शाखा अभियंता मयूरी पटवेगार, पाणीपट्टी अधिक्षक प्रशांत पंडत व मीटर रीडर संजय मिरजे व अन्य यांच्या सहभागातून ही कारवाई करण्यात आली.
या आढावा बैठकीत थकबाकीदार नळ कनेक्शन खंडित करणे, अनधिकृत नळ कनेक्शन तात्काळ तोडणे व त्यावर फौजदारी कारवाई करणे, तसेच नळ कनेक्शनला थेट विद्युत मोटर जोडल्याचे आढळल्यास संबंधित मोटर जप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते.
तरी कोल्हापूर शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या नळ कनेक्शनची थकबाकी तात्काळ भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. थकबाकी न भरल्यास नळ कनेक्शन खंडित करण्याची कटू कारवाई करण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.