चित्रपट निर्मितीचा ध्यास बाळगा : रणजित जाधव बी. ए. फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांशी संवाद
schedule10 Feb 26 person by visibility 92 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : प्रतिनिधी शिवाजी विद्यापीठाने चित्रपट निर्मितीचा अभ्यासक्रम सुरु करून कोल्हापूरची या क्षेत्रातील ओळख अधिक ठळक केली आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेत प्रचंड मेहनत घेऊन चित्रपट निर्मितीचा ध्यास बाळगावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे संचालक रणजित जाधव यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. फिल्म मेकिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी महामंडळाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी यावेळी चित्रपट महामंडळाची संस्थात्मक संरचना समजून घेतली. चित्रपट निर्मितीतील संघटनात्मक आणि व्यावसायिक पैलूंची यावेळी माहिती देण्यात आली.
जाधव म्हणाले, चित्रपट महामंडळाचे चित्रपट सृष्टीच्या विकासात मोठे योगदान आहे. कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते व दिग्दर्शक यांच्या हक्कांसाठी महामंडळ नेहमीच प्रयत्नशील असते. चित्रपट निर्मितीसाठी शास्त्रीय प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. शिवाजी विद्यापीठाने ती सोय केल्याने विद्यार्थ्यांना आता चित्रपट निर्मिती करणे अधिक सुलभ बनले आहे. दिग्दर्शक सतीश बिडकर म्हणाले, चित्रपट निर्मिती करत असताना चित्रपटाच्या सर्व तांत्रिक आणि अन्य बाबींची सखोल माहिती करून घ्या. आपली कलाकृती अधिकाधिक कलात्मक कशी होईल यावर विचार करणे गरजेचे आहे. फिल्म मेकिंगचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब खाडे, अनुप जत्राटकर आदींनी अभ्यास भेटीचे नियोजन केले. व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर यांनी स्वागत केले. यावेळी नम्रता गोडबोले, सिद्धेश मंगेशकर आदी उपस्थित होते.