डॉ. बाबासाहेबांच्या कार्यास राजर्षी शाहू महाराजांचा भक्कम आधार व पाठींबा: डॉ. सुनीलकुमार सरनाईक; रजपूतवाडी आश्रमशाळेत व्याख्यान
schedule21 May 25 person by visibility 365 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : "डॉ. बाबासाहेबांच्या समाज परिवर्तनाच्या कार्यास राजर्षी शाहू महाराजांचा भक्कम आधार व पाठींबा, तसेच सहकार्य होते, त्यामुळे त्यामुळेच डॉ.बाबासाहेब यांचे मनोधैर्य वाढले" असे प्रतिपादन समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांनी केले.
रजपूतवाडी येथील भटका व विमुक्त समाज विकास मंडळ, संचलित प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व महात्मा जोतीराव फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने डॉ.सरनाईक बोलत होते. अध्यक्षस्थानी भटका व विमुक्त समाजाचे नेते,दलितमित्र व्यंकाप्पा भोसले होते.
डॉ.सरनाईक म्हणाले," अस्पृश्य समाजातील डॉ. बाबासाहेबांच्या सारखा तरुण उच्च शिक्षण घेऊन दलितांच्या प्रश्नांवर आपली वाणी, लेखणी व बुध्दीचातुर्य वापरून त्यांच्या उद्धारासाठी झटतो आहे, हे राजर्षींचे सहकारी दत्तोबा पोवार याच्या कडून ऐकून शाहू महाराज मनातून खूपच सुखावले होते, त्यामुळेच १९१९ साली मुंबईत परळ येथील बाबासाहेब ज्या चाळीत रहात होते, तेथे जाऊन शाहू महाराजांनी डॉ बाबासाहेब यांची भेट घेतली, ही घटना महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील समाजपरिवर्तनाची नांदी ठरली आहे."
डॉ.सरनाईक यांनी उभयतांच्या भेटी बरोबरच डॉ . बाबासाहेब यांची कोल्हापूरातील भेटीवेळी महाराजांनी आयोजित केलेल्या सहभोजनाची, मुकनायक या वृत्तपत्रासाठी शाहू महाराजांनी केलेली आर्थिक मदत, माणगाव परिषदेतील शाहू महाराजांनी केलेले भाषण, तसेच नागपूर परिषदेच्या निमित्ताने शाहू महाराजांनी केलेली मदत व दलितांना बाबासाहेबांच्या रुपाने दिलेला पुढारी याविषयी साद्यंत माहिती दिली.
यावेळी आंबेडकरी चळवळीतील नेते प्रा.डॉ. अनिल माने, संस्थेचे कार्यवाह प्रा. सुनिल भोसले, शिल्पा भोसले ,रेखा भोसेले,तानाजी नंदिवाले, मुख्याध्यापक शिवाजी कोरवी, मुख्याध्यापक कृष्णा पाटील, विजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन
प्रदीप उबाळे, प्रास्ताविक निशिगंधा नलवडे व आभार प्रकाश वर्षे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व रजपूतवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.