अलमट्टी उंची बाबत 15 दिवसांनी सर्व पक्षीयांसह पुन्हा बैठक : जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील
schedule21 May 25 person by visibility 296 categoryराज्य

▪️15 दिवसात आंदोलकांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर अभ्यास करून येण्याचे पाटबंधारे अधिकाऱ्यांना आदेश
▪️येत्या आठ दिवसात कोल्हापूर मध्ये पाटबंधारे अधिकारी आणि आंदोलकांची बैठक घेऊन मुद्दे समजून घ्या : पालकमंत्री प्रकाश अबिटकरांच्या सूचना
▪️महापुरास आलमट्टी जबाबदार असून उंची वाढवण्यास शासनाने ताकतीने विरोध करावा अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवू : उंची वाढ विरोधी संघर्ष समितीचे माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांची भूमिका
कोल्हापूर : कोल्हापूर सांगलीत येणाऱ्या महापुरास अलमट्टी जबाबदारी नाही ही बैठकीच्या सुरुवातीची शासनाची भूमिका होती पण आंदोलकांनी याला जोरदार आक्षेप नोंदवून पुराव्यासह अलमट्टी कशी जबाबदार आहे हे ठासून सांगितल्याने मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या मुद्यावर पूर्ण अभ्यास करून 15 दिवसांनी पुन्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेऊन बैठक घेऊ.
तत्पूर्वी आंदोलकांनी निवेदन देऊन उपस्थित केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने आंदोलक आणि पाटबंधारे वरिष्ठ अधिकारी यांची कोल्हापूर मध्ये बैठक करावी अशा सूचना कोल्हापूर पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना आदेश केले.
या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलावले नसल्याने माजी मंत्री आमदार सतेज पाटील हे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत पण त्यांनी बैठक संपल्यावर मंत्रालयाबाहेर संघर्ष समितीच्या सदस्यांबरोबर चर्चा करून सरकारची भूमिका चुकीची असून या महापुरास अलमट्टी जबाबदार असून या धरणाची उंची वाढवून दिली जाणार नाही. सरकारने उंची वाढीला कायदेशीर विरोध न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल असा इशारा दिला.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार इद्रिस नायकवडी, डॉ. विनय कोरे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अमल महाडिक, सत्यजित देशमुख, सुहास बाबर, अशोकराव माने, माजी आमदार प्रकाश आवाडे व जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता ह.वि.गुणाले आणि कृती समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आंदोलकांच्या वतीने आमदार अरुण लाड, माजी आमदार उल्हास पाटील इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, माजी सभापती बाजार समिती कोल्हापूर भारत पाटील, माजी सभापती करवीर राजेंद्र सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, कृष्णा महापूर समितीचे सर्जेराव पाटील दिपक पाटील नागेश काळे डॉक्टर अभिषेक दिवाण दिनकर पवार उपस्थित होते.
🔹जागतिक बँकेने 3200 कोटी दिलेले आहेत त्यामध्ये कृष्णा नदीतील अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळवून महापुराचा प्रश्न संपवणार आहे असे सरकारच्या सर्व आमदारांनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकला उंची वाढवण्यास शासनाने कडाडून विरोध करावाच पण यावर्षी महापूर येऊ नये म्हणून केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे अलमट्टी धरण प्राधिकरणास पालन करण्यास लावावे व अडमुठी भूमिका घेतल्यास डॅम इन्चार्ज वर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पाटबंधारे अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी धनाजी चुडमुंगे यांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे केली.