पंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना
schedule16 Jun 26 person by visibility 204 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्यामुळे शहराच्या दैनंदिन पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज शिंगणापूर, नागदेवाडी व बालिंगा पंपिंग स्टेशनची प्रत्यक्ष पाहणी केली. सदरची पाहणी करतेवेळी विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे व सदस्य शिंगणापूर बंधा-यावर दाखल झाले.
या पुर्वीच्या पाहणीदरम्यान शिंगणापूर येथील बंधाऱ्यात गळतीचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत जलसंपदा विभागानेही महापालिकेशी पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे पाणी पातळी कमी झाल्याने बंधाऱ्याचे बर्गे काढून ते पुन्हा बसविण्याचे काम तातडीने हाती घेऊन संध्याकाळपर्यंत पुर्ण करण्यात आले. तसेच शिंगणापूर, नागदेवाडी व बालिंगा पंपिंग स्टेशनवरील पंपांची उचल क्षमता, कार्यकाल आणि पाणीउपसा व्यवस्थेची सविस्तर माहिती व वस्तुस्थिती आयुक्तांना व उपस्थित सदस्यांना अवगत करण्यात आली. पाणीपुरवठा अधिक प्रभावी करण्यासाठी विविध उपाययोजनांबाबतही सदस्यांनी यावेळी सूचना मांडल्या.
मान्सून लांबल्यामुळे काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी कमी झाल्याने थेट पाईपलाईन योजनेअंतर्गत होणारा पाणीउपसा बंद झाला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी पंपिंग स्टेशनमधून पाणीउपसा सुरू करण्यात आला आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी ५३३ मीटर लेव्हल आल्याने किमान 535 पेक्षा लेव्हल कमी झाल्याने या तीन्ही पंपिंग स्टेशनमधून आज सकाळी पाणी उपसा बंद झालेला आहे.
शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी तातडीने जलसंपदा विभागाशी समन्वय साधण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त व जल अभियंता यांना सूचना दिल्या. त्यानुसार राधानगरी धरणातून १२३३ क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले असून, उद्या दुपारपर्यंत नदीची पाणीपातळी वाढून पंपिंग स्टेशनद्वारे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षीत आहे.
यावेळी उपस्थित सदस्यांनी एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक प्रभावीपणे राबवून शहरातील सर्व भागांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी पाणीउपसा कमी प्रमाणात होत असल्याने महापालिकेने तातडीने भाड्याने टँकर उपलब्ध करून दिले असून, महापालिका तसेच खासगी टँकरच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसेवक सुभाष बुचडे, संजय मोहिते, अमर समर्थ, दुर्वास कदम, प्रशांत खेडकर, प्रविण सोनवणे, सचिन शेंडे, सागर यवलुजे, महेश उत्तूरे, उप जल अभियंता जयेश जाधव, शाखा अभियंता मयुरी पटवेगार व कर्मचारी उपस्थित होते.
तरी पावसाळा पूर्णपणे सुरू होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरेसा राहावा यासाठी नागरिकांनी पाण्याचा अत्यंत जपून व काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळून महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.