गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी ठराव बदलण्याच्या हालचाली करू नयेत : उदय शिंदे यांचे आवाहन
schedule25 Jul 26 person by visibility 180 categoryउद्योग
◼️गोकुळच्या कर्मचाऱ्यांना कायद्यानेच मतदानाचा अधिकार
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांनी ठराव बदलण्याच्या हालचाली करू नयेत, असे आवाहन कर्मचाऱ्यांच्यावतीने उदय शिंदे यांनी केले आहे. गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांना कायद्यानेच मतदानाचा अधिकार आहे, असेही शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकात शिंदे यांनी पुढे म्हटले आहे, गोकुळ दूध संघाच्या कर्मचा-यांना मतदानाचा अधिकार नाही म्हणून ठराव बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये वाचल्या. वास्तविक; अशा अफवांपासून गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी दूर राहिले पाहिजे. गोकुळचा कर्मचारी हा गोकुळचा एक महत्त्वाचा व जबाबदार घटक आहे. या निवडणुकीत गोकुळच्या कर्मचाऱ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.
ज्या कर्मचाऱ्यांनी गोकुळ दूध संघाला दूध मिळावे म्हणून संस्था काढल्या आणि आपल्या नावावर ठराव केले, त्यांना महाराष्ट्र राज्य सहकार कायदा- १९६० आणि दस्तुरखुद्द गोकुळ दूध संघाच्या उपविधीनुसार अधिकार प्राप्त होतो. त्यामध्ये घाबरून जाऊन विचलित होण्याचे काहीही कारण नाही. फक्त मल्टीस्टेट/ बहुराज्यीय कायद्याखाली नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांमध्येच कर्मचाऱ्यांना मतदानाचा अधिकार नसतो. त्यामुळे; गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी ठराव बदलण्याच्या अजिबात हालचाली करू नयेत आणि त्यांनी या निवडणुकीत ठाम भूमिका वठवावी.
*◼️हे तर भूमिपुत्रच......!*
शिंदे यांनी म्हटले आहे, गोकुळ दूध संघाचे बहुतांशी कर्मचारी हे कोल्हापूर जिल्ह्यातील भूमिपुत्र शेतकऱ्यांचीच मुले आहेत. आपापल्या गाव- खेड्यातील दूध संस्थांचे ते दूध उत्पादक सभासदही आहेत. गोकुळच्या स्थापनेपासूनच्या आजवरच्या वाटचालीत त्यांचे योगदानही मोठे आहे. संबंधित दूध संस्थांनी तसा ठराव करून दिल्यानंतर मतदार म्हणून ते कायद्यानेच हक्कधारक आहेत. गोकुळ दूध संघाच्या यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही अनेक कर्मचारी ठरावधारक होते.