बालकांचे शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर
schedule25 Jul 26 person by visibility 160 categoryशैक्षणिक
🟣 निमशिरगाव येथे १५ लाखांच्या निधीतून उभारलेल्या स्मार्ट अंगणवाडीचे लोकार्पण
निमशिरगाव :
बालकांचे शिक्षण आणि सर्वांगीण विकास हीच समाजाच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे. ग्रामीण भागातील चिमुकल्यांनाही शहरांप्रमाणे डिजिटल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी उभारण्यात आलेली स्मार्ट अंगणवाडी ही केवळ इमारत नसून भविष्यातील सुशिक्षित आणि सक्षम पिढी घडविण्याची भक्कम पायाभरणी आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. निमशिरगाव येथे १५ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक 'मॉडेल (स्मार्ट) अंगणवाडी' इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
आमदार डॉ. यड्रावकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात स्मार्ट अंगणवाडीचे लोकार्पण करण्यात आले.
या अंगणवाडीत आकर्षक रंगसंगती, बालसुलभ शैक्षणिक चित्रफलक, डिजिटल शिक्षणाची सुविधा, आधुनिक शैक्षणिक साहित्य, विविध बौद्धिक खेळणी तसेच सुरक्षित व आनंददायी वातावरणाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे चिमुकल्यांच्या बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. यावेळी गावातील ग्रामस्थांनी आणि पालकांनी स्मार्ट अंगणवाडीतील आधुनिक सुविधांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला सरपंच अश्विनी गुरव, उपसरपंच वैशाली पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, रूपाली मोरे, राजश्री कोगले, कल्पना दुधाळे, पुनम धनावडे, के. पी. पाटील, अविनाश पाटील, रघुनाथ साजणे, सर्जेराव धनवडे, मनोहर शिंदे, श्रीकांत पाटील, साहिल पाटील, तुषार सूर्यवंशी, अमोल चौगुले, महेश कोगले, सावकर कांबळे, महावीर पाटील, शैलेंद्र गुरव, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.