कसबा बावड्यात १४० चिमुकल्या वारकऱ्यांचा सहभाग; पर्यावरणपूरक आषाढी वारी उत्साहात
schedule25 Jul 26 person by visibility 235 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : आषाढ महिन्याच्या पवित्र पर्वावर मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. १, कसबा बावडा येथे "प्लास्टिकमुक्त व पर्यावरणपूरक आषाढी वारी" सोहळा भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. या सोहळ्यात १४० चिमुकल्या वारकऱ्यांनी सहभाग घेऊन परिसरात पंढरीचा अनुभव निर्माण केला.
दिंडीचे उद्घाटन सचिन चौगले आणि सुनंदा चौगले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रकरणी शाळा परिवारातर्फे स्वागत करण्यात आले. तब्बल १४० विद्यार्थी विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेत, कपाळी गंध आणि गळ्यात तुळशीमाळ घालून सहभागी झाले होते. टाळ-मृदुंगाचा गजर, अभंगांच्या सुरेल धून आणि "ज्ञानोबा-तुकाराम" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
शाळेपासून सुरू झालेली ही दिंडी भगतसिंग वसाहत, यशवंत कॉलनी, कृष्णानंद कॉलनी, ठोंबरे मळा मार्fat विठ्ठल मंदिरापर्यंत पोहोचली. या मार्गात पालखीचे दर्शन, विद्यार्थिनींच्या फुगड्या आणि पालकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.
या सोहळ्याला महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. लहान वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांना केळी आणि पौष्टिक राजगिरा लाडू वाटप करण्यात आले. मुलांमध्ये संस्कार आणि पर्यावरणप्रेम रुजवण्याचे हे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कापडी पिशव्या, कागदी झेंडे आणि पानांचा वापर करत ही वारी पूर्णपणे प्लास्टिकमुक्त ठेवण्यात आली. लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि वारकरी परंपरेचे संस्कार रुजवण्याचा हा एक यशस्वी प्रयत्न ठरला.
डॉ. अजितकुमार पाटील आणि उत्तम कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
विद्या पाटील, उत्तम पाटील, अमित पोटकुले, आर. जी. कीर्तीकर, दीपाली भापकर, नेमिस्टे, बालवाडी मुख्याध्यापिका कल्पना पाटील, सावित्री काळे, शाळा व्यवस्थापन समिती, प्रभुदास दाभाडे, राहुल आळवेकर, विशाल चव्हाण तसेच परिसरातील पालक आणि मान्यवर या सोहळ्यात सहभागी झाले होते.