मुंबईत स्वतंत्र नाट्यगृह व चित्रपटगृह उभारणार : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार
schedule24 Mar 26 person by visibility 83 categoryराज्य
▪️मराठी चित्रपटांना २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य , कोविड काळातील ९८ चित्रपटांना दिलासा; शासनमार्फत ४ कोटी ९० लाखाचा निधी वाटप
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य या योजनेंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षण केलेल्या ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील ६५ चित्रपट आणि कोविड काळातील ९८ चित्रपटांना २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्ये टप्प्याटप्प्याने मराठी चित्रपटगृहांचे जतन आणि विकास करण्यात येणार आहे. तसेच मुंबईत एकत्रित सुविधांसह स्वतंत्र नाट्यगृह व चित्रपटगृह उभारण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्यावतीने आयोजित दर्जेदार चित्रपटांना अर्थसहाय्य योजनेचा धनादेश वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, विविध चित्रपटाचे निर्माते यावेळी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘श्यामची आई’ या चित्रपटास ७९ लाखांचा निधी वितरित करण्यात आला. तसेच अपर्णा होशींग, शेट्टी, स्नेहल तरडे या दिग्दर्शक महिलांना प्रत्येकी ५ लाख प्रोत्साहन निधी देऊन गौरविण्यात आले.
मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्र हा वैभव संपन्न व प्रतिभा संपन्न आहे. महाराष्ट्रात कला, साहित्य, जागरूक नागरिक, उत्कृष्ट कलावंत या सगळ्याची पेरणी आहे. दर्जेदार मराठी चित्रपट निर्माण व्हावे यासाठी प्रत्येक टप्प्यावर राज्य शासन काम करत आहे. मराठी क्षेत्रातील निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना कार्यान्वित आहेत. त्या माध्यमातून चित्रपटांच्या 'अ' दर्जासाठी ४० लाख, 'ब' दर्जासाठी ३० लाख आणि क दर्जासाठी दहा लाख रुपये अनुदान वाटप करण्यात येत आहे.
२०१८ ते २०२२ या कोविड काळात सर्व व्यवस्था ठप्प झाली होती. या कालावधीत निर्मात्यांची अवस्था गंभीर झाली होती. या कालावधीतील सेन्सॉर प्राप्त चित्रपटांना ४ कोटी ९० लाख रुपयांचे वितरण करण्यात येत आहे. चित्रपटाचे परीक्षण करण्यासाठी 28 सदस्याची समिती गठीत करण्यात आली आहे. हे सदस्य चांगल्या प्रकारे काम करत आहेत. चित्रपटांचे परीक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने २०२३ ते २०२६ या कालावधीमध्ये ४९६ चित्रपटाची परीक्षण केले आहे. या माध्यमातून मराठी चित्रपटांचा सार आपल्या समोर आणलेला आहे. त्यातून गुणवत्तापूर्ण चित्रपटांना चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
मराठी सिनेमागृह, निर्मात्यांसाठी शूटिंगची व्यवस्था, त्यांना मिळणाऱ्या परवानग्या, त्या परवानग्यामधील सुलभता, त्याबरोबर लागणारे कौशल्य गुणवत्तेबद्दलचा प्लॅटफॉर्म, गुणवत्तेबरोबर लागणारे प्रशिक्षण असे विविध कार्यक्रम शासनामार्फत राबवण्यात येत आहेत असेही मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी म्हणाले, प्रशासन किंवा फिल्मसिटी आणि निर्माते यांच्या संवादातूनच आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीसाठी काही चांगलं घडवता येणार आहे. मराठी भाषा ही अतिशय चांगल्या पद्धतीने साहित्यनिर्मिती करते आहे. जगातल्या इतर कुठल्या भाषेमध्ये आढळणार नाही, असे कथांचे भांडार मराठी भाषेत आहे. आशयाच्या गुणवत्तेच्या बाबतीत आणखी प्रगती आणि पुढे जाणे आवश्यक आहे. त्याकडे निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी थोडे सजगपणे पाहणे आवश्यक आहे.
एनडी स्टुडिओ, कोल्हापूरच्या चित्रनगरीत अतिशय सुंदर अशा पद्धतीची रचना आणि सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी असलेल्या सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग निर्मात्यांनी घ्यावा ,असे आवाहन सचिव डॉ.कुलकर्णी यांनी निर्मात्यांना केले.


