मान्सूनपूर्व नाले व चॅनल सफाई मोहिमेला सुरुवात; ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन
schedule24 Mar 26 person by visibility 105 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मान्सूनपूर्व नालेसफाई व चॅनल सफाई मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील पावसाळ्यातील पाणी निचरा सुरळीत व्हावा, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
दि. २० मार्च २०२६ पासून महानगरपालिकेच्या स्वमालकीच्या पोकलेन मशीनद्वारे नालेसफाईच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. या पोकलेन मशीनच्या साहाय्याने ही कामे वेगाने सुरू असून, योगेश्वरी कॉलनी व एन. टी. सरनाईक नगर परिसरातून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.
यासोबतच, मनुष्यबळाच्या माध्यमातून चॅनल सफाईचे कामही हाती घेण्यात आले असून, यासाठी ४० कर्मचाऱ्यांची स्वतंत्र टीम कार्यरत आहे. प्रभाग क्रमांक २ व प्रभाग क्रमांक २० येथून या कामांची सुरुवात करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या नियोजनानुसार, जेसीबीद्वारे साफ करण्यात येणाऱ्या नाल्यांची संख्या २३६ असून, मनुष्यबळाद्वारे साफ होणाऱ्या चॅनलची संख्या ४७६ आहे. तसेच शहरातील ५ मोठ्या नाल्यांचीही विशेष सफाई केली जाणार आहे.
सदर नाले व चॅनल सफाईची सर्व कामे दि. ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने निश्चित केले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


