सुदृढ तरुण हाच विकसित भारताचा शिल्पकार: जिल्हाधिकारी अमोल येगडे
schedule24 Mar 26 person by visibility 81 categoryशैक्षणिक
▪️शिवाजी विद्यापीठात २०० जणांची मोफत आरोग्य तपासणी; ४५ जणांचे रक्तदान
कोल्हापूर : निरोगी आणि सुदृढ तरुण हाच विकसित भारताचा शिल्पकार आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाचा भौतिकशास्त्र अधिविभाग, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि नीम करौली बाबा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज 'मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर' उत्साहात पार पडले. शिबिराच्या उद्घाटन समारंभात श्री. येडगे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी होते.
या शिबिरात १५४ जणांची सामान्य शारीरिक चाचणी, तर ४६ जणांचे ईसीजी करण्यात आले. ४५ जणांनी रक्तदान केले.
कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरच आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. अशी शिबिरे आरोग्यविषयक जाणीवजागृतीचे काम करतात.
भौतिकशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. मानसिंग टाकळे यांनी आभार मानले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य स्वागत परुळेकर, मेनन बेअरिंग्ज लिमिटेड आणि मेनन अल्कॉप लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अरुण आराध्ये, सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक भूषण मिरजे, वैद्यकीय समन्वयक कृष्णा लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.


