SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
घोडावत गुळ प्रकल्पाचे धुराडे कोसळलेडी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा 'ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप' प्रथमरमजान ईद व गुढीपाडवा निमित्त ‘गोकुळ’ च्या दुधाची विक्रमी विक्रीपर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण काळाची गरजमाणगाव परिषदेतून सामाजिक बदलाची खरी सुरुवात : जिल्हाधिकारी अमोल येडगेपवित्र रमजान ईद: संयम, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचा मंगल सोहळाभारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ: सनईचे जादुगार आणि भारतीय संस्कृतीचे दूतऐतिहासिक माणगाव परिषदेचा १०६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा होणार :जिल्हाधिकारी अमोल येडगेविद्यापीठात जीएसटी सुधारणांबाबत सोमवारपासून राष्ट्रीय चर्चासत्रजनकल्याणाच्या योजना गावागावात पोहोचवून कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्यात आदर्श बनवण्याचे काम नूतन पदाधिकारी आणि सदस्यांनी करावे: खासदार धनंजय महाडिक यांची सूचना

जाहिरात

 

माणगाव परिषदेतून सामाजिक बदलाची खरी सुरुवात : जिल्हाधिकारी अमोल येडगे

schedule21 Mar 26 person by visibility 136 categoryराज्य

* 'बहिष्कृत परिषदे'चा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
* राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

कोल्हापूर : समाजातील अनिष्ट प्रथा आणि परंपरा नष्ट करण्यासाठी १९२० साली आयोजित करण्यात आलेल्या माणगाव परिषदेतून खऱ्या अर्थाने सामाजिक बदलाची सुरुवात झाली, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ व २२ मार्च १९२० रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे दक्षिण महाराष्ट्रातील पहिली 'बहिष्कृत परिषद' आयोजित करण्यात आली होती. या ऐतिहासिक घटनेचा १०६ वा वर्धापन दिन आज माणगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, माणगाव परिषदेत संमत करण्यात आलेल्या १५ ठरावांवरूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढील कार्याची दिशा कशी निश्चित झाली, याची प्रचिती येते. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बहिष्कृत वर्गाच्या कल्याणासाठी जी महत्त्वाची पावले उचलली, त्यांचा समावेश पुढे बाबासाहेबांनी भारतीय संविधानात केला. संविधानाद्वारे समान शिक्षण, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक न्याय यांसारख्या अनेक मूलभूत घटकांना कायदेशीर अधिष्ठान मिळाले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेत बाबासाहेबांनी जगभरात जो नावलौकिक मिळवला, तो आजही समाजासाठी मोठा आदर्श आहे. या उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी 'बार्टी' आणि सामाजिक न्याय विभागाचे आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचशील ध्वजारोहण करण्यात आले, सर्व मान्यवरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व परिसराची पाहणी केली. तसेच माणगाव परिषदेवर आधारित होलोग्राफिक शो पहिला. 

◼️२०० कोटींचा विकास आराखडा लवकरच मंजूर होईल : आ. अशोकराव माने
आमदार अशोकराव माने यांनी माणगावच्या विकास आराखड्याबाबत माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन विविध बैठकांच्या माध्यमातून हा प्रस्ताव मुंबईला पाठवला असून, राज्य शासनाकडून सुमारे २०० कोटी रुपयांचा हा आराखडा पुढील सहा महिन्यांत मंजूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परिषदेच्या इतिहासाबद्दल बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील बहिष्कृत समाजाला न्याय देण्यासाठी आप्पासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने ही परिषद झाली होती. शाहू महाराजांनी या परिषदेसाठी बाबासाहेबांचे नाव सुचवले आणि ही परिषद समाजाला संघटित करणारी ठरली. १५ ठरावांच्या माध्यमातून बहिष्कृत समाजाला मोठी ताकद मिळाली. 'शिका आणि संघटित व्हा' या मंत्राचा पाया याच ठिकाणी रचला गेला. ही केवळ एक परिषद नसून एका क्रांतीची सुरुवात होती.

माजी आमदार राजीव आवळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आप्पासाहेब पाटील यांनी दोन महापुरुषांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगातही महापुरुषांचा खरा इतिहास विसरू नका असे आवाहन त्यांनी केले. अनिल कांबळे यांनी माणगाव येथील होलोग्राफीक शो, लंडन हाऊसची प्रतिकृती, परिषदेतील १५ ठरावांचा शिलालेख आणि 'तक्या' इमारतीच्या माध्यमातून इतिहास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे सांगून युवकांनी पुस्तके आणि ग्रंथांची संगत धरावी असे आवाहन केले. 

या कार्यक्रमाला आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, आप्पासाहेब पाटील यांचे वंशज दिलीप पाटील, माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, प्रांताधिकारी दीपक शिंदे, समाज कल्याण सहायक आयुक्त सचिन साळे, शशिकांत कांबळे, अनिल कांबळे यांच्यासह अनेक नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहायक आयुक्त समाज कल्याण (कोल्हापूर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी, पुणे), ग्रामपंचायत आणि बौद्ध समाज (माणगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वागत आणि आभार प्रदर्शन सहायक आयुक्त यांनी केले.

कार्यक्रमानंतर रूपेश निकाळजे (बीड) प्रस्तुत क्रांतीचा साक्षीदार हे एक पात्री नाटक सादर करण्यात आले. तसेच उद्या रविवारी २२ मार्च रोजी सायंकाळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे व कबीर नाईकनवरे प्रस्तुत प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes