राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा, पालकांनी सहकार्य करावे : आरोग्याधिकारी प्रकाश पावरा
schedule03 Nov 26 person by visibility 117 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय जंतनाशक मोहीम २०२६ अंतर्गत आज श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर, जरगनगर आणि नेहरूनगर विद्यामंदिर, नेहरूनगर येथे विद्यार्थ्यांसाठी जंतनाशक गोळी सेवनाबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. एक ते १९ वर्षे वयोगटातील सर्व पात्र बालकांनी जंतनाशक गोळीचे सेवन करावे आणि पालकांनी या मोहिमेत सक्रिय सहकार्य करावे असे आवाहन आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कौसर बागवान, आरोग्य समितीच्या सभापती सुरेखा ओटावकर, प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती शीला सोनुले, उपसभापती पूजा पवार, स्थानिक नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, नगरसेविका रेखा उगवे, सौ. माधुरी व्हटकर, डॉ. सुषमा जरग आणि ॲड. मानसी लोळगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे महत्त्व विशद केले. एक ते १९ वर्षे वयोगटातील पात्र बालकांनी जंतनाशक गोळीचे सेवन केल्यामुळे शरीरातील कृमींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. परिणामी मुलांचे आरोग्य, शारीरिक वाढ, पोषण आणि बौद्धिक विकास सुधारण्यास हातभार लागतो. त्यामुळे प्रत्येक पात्र बालकापर्यंत या मोहिमेचा लाभ पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेविका ॲड. मानसी लोळगे यांनी बालकांच्या निरोगी आरोग्यासाठी जंतनाशक मोहीम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून सर्व पात्र विद्यार्थ्यांनी गोळीचे सेवन करून मोहिमेत सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
नगरसेविका डॉ. सुषमा जरग यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिवापर टाळण्याचा सल्ला दिला. मोबाईलपासून दूर राहून मैदानी खेळ, नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचालींना प्राधान्य द्यावे. निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासोबतच जंतनाशक मोहिमेतही सर्व पात्र मुलांनी सहभागी व्हावे असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय जंतनाशक मोहीम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्पिता खैरमोडे, मुख्याध्यापिका ठोंबरे, साळुंखे, आरोग्य कर्मचारी आणि दोन्ही शाळांतील शिक्षक, शिक्षिका यांनी विशेष सहकार्य केले. तसेच यावेळी इस्माईल बागवान, योगेश ओटावकर, प्रसाद उगवे, संतोष जरग यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती, आरोग्य विशेष समिती आणि प्राथमिक शिक्षण मंडळ समिती यांच्या माध्यमातून सर्व पात्र बालकांचे जंतनाशक गोळी सेवन सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेचा उद्देश सफल होण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना जंतनाशक गोळी सेवनाबाबत प्रोत्साहित करून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.