पुण्यात 'पबजी' खेळण्याच्या नादात गोळीबार, तरुण जखमी
schedule04 Aug 25 person by visibility 271 categoryगुन्हे

पुणे : उत्तमनगर भागात 'पबजी' खेळता खेळता तरुणाकडून मित्रांना पिस्तूल दाखवण्याचा नादात मित्राकडूनच गोळी सुटली. मित्राच्या पायात गोळी लागली. काल रात्री उशिरा ही घटना घडली. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले.
पुण्यातील उत्तमनगर परिसरात ५ तरुण हे त्यांच्यापैकी असलेल्या एकाच्या घरात बसून "पबजी" मोबाईल गेम खेळत होते. दरम्यान, यातील एकाने त्याच्याकडे असलेलं पिस्तूल बाहेर काढलेआणि तो इतर मित्रांना दाखवायला लागला. रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास हे पिस्तूल लोड अनलोड करण्याच्या नादात यातील एकाच्या हातातून पिस्तुलातून गोळी बाहेर पडली आणि थेट समोर बसलेल्या मित्राच्या पायाला लागली.
ही सगळी घटना कोणाला कळू नये म्हणून या मित्रांनी बनाव केला. जखमी झालेल्या तरुणाने पोलिसांना फोन करून त्याच्यावर गोळीबार झाला असल्याची खोटी माहिती दिली. तपास आणि चौकशी करत असताना पोलिसांना या तरुणांवर संशय आला. पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवताच या तरुणांनी घडलेला खरा प्रसंग सांगितला. उत्तमनगर पोलिसांनी या तरुणांपैकी एकाकडे असलेले पिस्तूल जप्त केले असून या सर्व ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.