कोल्हापूर जिल्ह्यात सलग १७ तास रिक्षा बंद; प्रवाशांची गैरसोय, विविध ठिकाणी निदर्शने
schedule23 Nov 26 person by visibility 239 categoryराज्य
कोल्हापूर : प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी रिक्षा बंदला सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. रविवारी मध्यरात्रीपासून ते सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत रिक्षांची चाके जागीच थांबल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
बाईक टॅक्सीला परवानगी देऊ नये, 'एटीएस' मशिनद्वारे होणाऱ्या पासिंगमधून सूट मिळावी आणि ई-रिक्षांना परमिट बंधनकारक करावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा बंद पाळण्यात आला. आंदोलनादरम्यान कोल्हापुरात रिक्षा संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शासनाच्या धोरणाचा निषेध केला आणि तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी विजय राठोड यांना निवेदन दिले तसेच आमदार सतेज पाटील यांनी पाठिंबा दर्शवला
कागलमध्ये मुख्य आठवडी बाजाराच्या दिवशीच रिक्षा बंद राहिल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. तर इचलकरंजी येथे रिक्षांना काळे झेंडे लावून शिवतीर्थापासून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आले. अखेर सायंकाळी पाच वाजल्यानंतर रिक्षा सेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.