कोल्हापूर महापालिकेच्यावतीने भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण सुरु
schedule23 Mar 26 person by visibility 132 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरातील भटक्या श्वानांना विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत रेबीज प्रतिबंधक लस देणेत येत आहे. यामध्ये शहरातील विविध परिसरातील 930 भटक्या श्वानांना लसीकरण करण्यात आले आहे. ही मोहिम संपूर्ण शहरात राबविण्यात येणार आहे. आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मोहिम पुर्ण राबविण्यात येत आहे.
भटक्या श्वानांबाबत पशु जन्म प्रतिबंध (भटके श्वान) हा कायदा आहे. या कायद्यानुसार भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिलेले आहेत.
तसेच या कायद्यानुसार भटक्या श्वानांना मारणे अथवा इतरत्र नेऊन सोडणे यास पुर्णपणे मनाई आहे. या कायद्याप्रमाणे महानगरपालिकेचे भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करण्याचे कामकाज सुरु आहे. यामध्ये महापालिकेच्यावतीने शहरातील 11327 पेक्षा जास्त भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण आजअखेर करण्यात आले आहे. कायद्यातील तरतूदीनुसार शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची शस्त्रक्रियेनंतर योग्य ती देखभाल व पोषण करुन शस्त्रक्रियेची जखम बरी झालेनंतर पकडलेल्या श्वानांना त्यांच्या मुळ जागी सोडण्यात येते.
भटक्या श्वानांना रेबीज हा प्रामुख्याने होणार आजार आहे. यामध्ये कुत्रा पिसाळून मनुष्य व इतर प्राण्यांचा चावा घेतो. त्यामुळे रेबीज हा रोग त्यांना देखील होऊ शकतो. याकरीता शहरातील सर्व भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस महापालिकेच्यावतीने देण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेमार्फत कुत्री पकडण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या जाळया तयार केल्या आहेत. या जाळयाद्वारे त्यांना पकडून जागेवरच ही लस देण्यात येते. त्यांनतर लस दिलेल्या कुत्र्याला ओळख म्हणून निळा रंगाची विशीष्ट खूण केली जाते. लस दिल्यानंतर त्याला लगेच सोडले जाते. कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत दरवर्षी भटक्या श्वानांकरीता अशा प्रकारची विशेष मोहिम घेण्यात येते. सन 2024-25 मध्ये 6500, सन 2025-26 मध्ये 7200 भटक्या श्वानांना रेबीज लस देण्यात आलेली आहे.
हि विशेष मोहिमे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, सोसायटी फॉर ॲनीमल प्रोटेक्शन संस्थेचे डॉ.चंद्रहास कापडी, डॉ.शामराव पाटील, दिपक मिसाळ, मृदूला दुबल, राधिका बरीशेट व इतर प्राणीप्रेमी यांच्या मार्फत करण्यात आली.
तरी नागरीकांकरीता रेबिज प्रतिबंधात्मक लस छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (CPR) व सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडे उपलब्ध असून सदर लसीचा डोस विहित वेळापत्रकानुसार (0, 3, 7, 14, 28) असा आहे.


