SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​"कोल्हापूरच्या हद्दवाढीवर निर्णय घ्या, ...": आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात केली सरकारची कोंडी!राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचे 26 जून रोजी उद्घाटनशिरोळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायत इमारतींसाठी १ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा पाठपुरावा विद्यार्थीसंख्या वाढीसाठी गुणवत्ता आणि विश्वासार्हता आवश्यक : डॉ. विलास शिंदेकळंबा तलावातील गाळ उपशासाठी शेतकऱ्यांना महापालिकेचे आवाहनबोगस डॉक्टरांचे आता खैर नाही! 'नो युवर डॉक्टर' क्यूआर कोड स्कॅन करा आणि तपासा; हसन मुश्रीफ यांचा इशाराआरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागेशाहू जयंतीदिनी कोल्हापूर जिल्हा परिषदेत रंगणार 'महा रक्तदान शिबिर'; खा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते होणार उद्घाटनकोल्हापुरात धक्कादायक घटना: माजी महापौरांच्या १७ वर्षीय नातवाची आत्महत्यास्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये २७ जूनला अभियांत्रिकी प्रवेशाबाबत मार्गदर्शन

जाहिरात

 

विद्यार्थीसंख्या वाढीसाठी गुणवत्ता आणि विश्वासार्हता आवश्यक : डॉ. विलास शिंदे

schedule24 Jun 26 person by visibility 124 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : विद्यार्थीसंख्या वाढीसाठी गुणवत्ता आणि विश्वासार्हता आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी केले. 
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील ८९ अभ्यासकेंद्रांतील समन्वयक व लेखनिकांसाठी आयोजित कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी संगणक केंद्राचे संचालक अभिजित रेडेकर, उपकुलसचिव डॉ. प्रल्हाद जाखले, सिस्टीम प्रोग्रामर शशी हुक्केरी, समन्वयक डॉ. चांगदेव बंडगर तसेच विविध अभ्यासकेंद्रांचे समन्वयक, दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील समन्वयक व सहायक प्राध्यापक उपस्थित होते.

डॉ. शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार सन २०३५ पर्यंत उच्च शिक्षण संस्थांमध्ये व्यापक बदल अपेक्षित आहेत. गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या संस्था अधिक स्वायत्त होतील, तर गुणवत्ता निकष पूर्ण न करणाऱ्या संस्थांबाबतही आवश्यक निर्णय घेतले जातील. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयाने गुणवत्तावृद्धीला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

 विद्यापीठाकडून विविध शैक्षणिक व प्रशासकीय बाबींची पडताळणी केली जाणार असून गुणवत्तेचे मूल्यमापनही करण्यात येणार आहे.

ते पुढे म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक शैक्षणिक वातावरणात चांगले विद्यार्थी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षक घडविणे ही काळाची गरज आहे. विना-अनुदानित संस्था, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि विविध विद्यापीठांमधील वाढती स्पर्धा यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर संस्थांनी शैक्षणिक गुणवत्ता, विश्वासार्हता आणि लौकिक वृद्धिंगत करण्यावर भर देणे आवश्यक आहे. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासकेंद्रांमार्फत अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाच्या संधी पोहोचविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संगणक केंद्राचे संचालक अभिजित रेडेकर यांनी ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेतील तांत्रिक प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की, विद्यापीठाच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये सातत्याने नवे मॉड्यूल्स आणि सुविधा विकसित करण्यात येत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि विद्यार्थी-केंद्रित व्यवस्था निर्माण करण्यासाठी संगणक केंद्र प्रयत्नशील आहे. तसेच दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यशाळेत नव्याने अभ्यासकेंद्र सुरू करणाऱ्या शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे महाविद्यालय, मिरज, व्यंकटराव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आजरा तसेच कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुंभारी (जि. सांगली) यांच्या समन्वयकांचा कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सातारा विभागीय केंद्राचे समन्वयक डॉ. सूर्यकांत गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले, तर उपकुलसचिव विनय शिंदे यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes