कोल्हापुरात रेशन कार्डधारकांचा एल्गार; महागाई आणि रेशन कपातीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
schedule27 Apr 26 person by visibility 123 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यातील रेशन व्यवस्था कोलमडली असून सरकार सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोप करत आज रेशन बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. 'मिशन सुधार' मोहिमेतंर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ३४,००० रेशन कार्ड रद्द करण्याच्या हालचाली सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करताना विजय देवणे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, उज्ज्वला योजनेच्या नावाखाली गॅस देऊन सरकारने रॉकेल बंद केले, पण आता गॅस सिलिंडरचे दर आवाक्याबाहेर गेल्याने गरीब जनतेला पुन्हा चुलीकडे वळावे लागत आहे. ही प्रगती नसून अधोगती असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. रेशन कार्डसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा १ लाखावरून २ लाख रुपये करावी, गॅस सिलिंडर ५०० रुपयांत द्यावा आणि रेशनवर दरमहा ५ लिटर रॉकेल पुन्हा सुरू करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. केवळ गहू आणि तांदळावर कुटुंब जगू शकत नाही, त्यामुळे रेशन दुकानांतून गोडेतेल, साखर, तूरडाळ, ज्वारी आणि हरभरा डाळ या पाच जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात देण्याची मागणीही लावून धरण्यात आली आहे.
आंदोलकांनी इशारा दिला की, जर सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर आगामी काळात तीव्र 'हल्लाबोल' आंदोलन छेडले जाईल. महागाईमुळे मेटाकुटीला आलेली जनता गप्प बसणार नाही आणि वेळ पडल्यास बाजारपेठा लुटल्या जातील, त्यास शासन जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील शेकडो रेशन कार्डधारक महिला व पुरुष सहभागी झाले होते.