पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटमुळे परिसराच्या अर्थचक्राला मोठी चालना : आमदार यड्रावकर
schedule28 Sep 26 person by visibility 240 categoryउद्योग
◼️पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्री इस्टेट लिमिटेडची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
यड्राव : शेतकऱ्यांच्या मुलांनी केवळ शेतीपुरते मर्यादित न राहता उद्योगाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहावे, या दूरदृष्टीतून स्व. शामराव पाटील यड्रावकर यांनी ४५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटच्या वाटचालीने आज मोठे औद्योगिक रूप धारण केले आहे. यड्राव परिसरातील या औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात उद्योग कार्यरत असून, त्यातून परिसराच्या अर्थचक्राला मोठी चालना मिळत आहे. भविष्यात उद्योग उभारणीला चालना देऊन शिरोळ तालुक्याचा औद्योगिक विस्तार अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले.
पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्री इस्टेट लिमिटेडची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. प्रारंभी स्व. शामराव पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रारंभी स्वागत प्रकाश अकिवाटे यांनी केले. श्रद्धांजलीचा ठराव व्हाईस चेअरमन महावीर खवाटे यांनी मांडला.
यावेळी आमदार यड्रावकर यांनी औद्योगिक वसाहतीच्या भविष्यातील विकासाचा आढावा घेतला. औद्योगिक विकासासोबत परिसराची स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. शिरोळ तालुक्यात उद्योगांची संख्या वाढत असताना स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी एमआयडीसी उभारणीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये महिलांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे आमदार यड्रावकर यांनी स्पष्ट केले. तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने सोलर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सर्व विषयांना सभासदांनी हात वर करून एकमताने मंजुरी दिली. यावेळी चेअरमन व संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, आदित्य पाटील यड्रावकर, अजय पाटील यड्रावकर, यड्रावचे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर, आर. जे. कांबळे, सुभाषसिंग रजपूत, संचालक किरण बरगाले, चंद्रकांत कांबळे, राहुल बंडगर, जैनुल बागवान, रत्नमाला गांधी, सुवर्णा पाटील, संजय बिडला, ताजोद्दीन तहसिलदार यांच्यासह मोठ्या संख्येने उद्योजक व सभासद उपस्थित होते. आभार महावीर पाटील यांनी मानले.