एस.टी. महामंडळाच्या सवलतीच्या पाससाठी गावागावात कॅम्प आयोजित करा; करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
schedule03 Aug 26 person by visibility 154 categoryराज्य
कोल्हापूर : एस.टी. महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक आणि इतर सवलतधारकांसाठी 'स्मार्ट कार्ड' (एन.सी., एम.सी.) अनिवार्य करण्यात आले आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदणी केंद्रांवर अपुऱ्या यंत्रणेमुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून, तासनतास रांगेत उभे राहूनही कार्ड मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या समस्येवर तातडीने मार्ग काढत गावोगावी विशेष कॅम्प आयोजित करावेत, अशी ठाम मागणी करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन राज्य परिवहन कोल्हापूर विभागाच्या विभाग नियंत्रक श्रीमती वृषाली भोसले यांना देण्यात आले.
प्रवाशांची होणारी हेळसांड आणि प्रशासनाचे दुर्लक्ष
सध्या स्मार्ट कार्ड काढण्यासाठी सवलतधारक प्रवाशांना मुख्य आगार किंवा तालुका-जिल्हा मुख्यालयातील बसस्थानकावरच जावे लागत आहे. नोंदणी केंद्रांची संख्या अत्यंत अपुरी असल्यामुळे महिला, मुली आणि ज्येष्ठ नागरिकांना दिवस-दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. वारंवार बसस्थानकाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याने प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाया जात असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असून प्रवाशामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या :
प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने प्रशासनासमोर खालील मागण्या ठेवण्यात आल्या आहेत:
* गावोगावी आणि शाळा-महाविद्यालयांत शिबिरे: स्थानिक यंत्रणेची (ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, आशा वर्कर किंवा स्थानिक स्वराज्य संस्था) मदत घेऊन प्रत्येक तालुक्यात व मोठ्या गावांमध्ये अतिरिक्त नोंदणी केंद्रे सुरू करावीत. तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थिनींचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, जेणेकरून विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
* जागीच कार्ड वितरण: विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करून त्याच ठिकाणी स्मार्ट कार्डचे वितरण करावे, तरच प्रवाशांना खरा दिलासा मिळेल.
* कंत्राटदारांची माहिती जाहीर करावी: ज्या कंत्राटदाराकडे स्मार्ट कार्ड काढण्याचे काम दिले आहे, त्या कंत्राटदारांची नावे व संपर्क क्रमांक संबंधित बसस्थानकाच्या बाहेर फलकावर दर्शनी भागात लावण्यात यावेत.
◼️प्रशासन सकारात्मक; गावोगावी कॅम्पचे आश्वासन
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या समस्या गांभीर्याने घेत, सवलतीचे पास काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना कळवून गावपातळीवर गावोगावी कॅम्प आयोजित केले जातील. प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे आश्वासन यावेळी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले.
या शिष्टमंडळात करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, उपतालुकाप्रमुख राहुल गिरुले, फेरीवाला संघटना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलवडे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, युवा सेना समन्वयक सचिन नागटिळक, सुनील पारपानी, वाहतूक सेना तालुकाप्रमुख दत्ता फराकटे, दीपक पोपटाणी, प्रकाश मुदुगडे, बाबुराव पाटील, अजित चव्हाण, शिवाजी लोहार, रामराव पाटील, वसंत पोवार, गणेश चावरे, राजेंद्र यादव यांच्यासह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.