जनसुराजच्या मेळाव्याला नवीद मुश्रीफ यांची उपस्थिती
schedule29 Jun 26 person by visibility 201 categoryउद्योग
कोल्हापूर : जनसुराज्य शक्ती पक्षाचा गोकुळ ठरावधारकांचा मेळावा कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लबमध्ये आयोजित केला होता. या मेळाव्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव व गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची उपस्थिती होती.
जनसुराज्यचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात अमर पाटील यांनी स्वागत केले. आमदार अशोकराव माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष सुमित कदम, करणसिंह गायकवाड, केडीसीसीचे माजी संचालक सर्जेराव पाटील- पेरीडकर यांची मनोगते झाली.
यावेळी बोलताना जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले, गेली पाच वर्षे अतिशय चांगला कारभार झालेला आहे. नामदार हसन मुश्रीफ यांनी सर्वच नेतेमंडळी व सहका-यांना विश्वासात घेऊन काम केलेले आहे.
नवीद मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जनसुराज्यचे नेते व आमदार डाॅ. विनय कोरे यांचे निमंत्रण आल्यामुळे मी त्या मेळाव्याला गेलो होतो. जनसुराज्य हा महायुतीमधील एक महत्त्वाचा पक्ष आहे. आम्ही सर्वजण महायुती म्हणूनच या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
◼️राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज दाखल केले ९७ ठराव
कोल्हापूर : गोकुळ दूध संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज सोमवार दि. २९ रोजी ९७ ठराव दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात श्री. आसुर्लेकर- पाटील यांनी राष्ट्रवादीची ठरावसंख्या१,९८२ होणारच असा विश्वास व्यक्त केला होता. तसेच; उद्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आणखीन ठराव दाखल केले जाणार आहेत.