झांबिया-भारत शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबियाच्या उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळाची वारणा विद्यापीठाला सदिच्छा भेट
schedule29 Jun 26 person by visibility 155 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : वारणा विद्यापीठाच्या जागतिक शैक्षणिक विस्ताराच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत झांबियाच्या उच्च शिक्षण व शिष्यवृत्ती क्षेत्रातील उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळाने विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे भारत आणि झांबिया यांच्यातील शैक्षणिक, संशोधन व विद्यार्थी देवाणघेवाण क्षेत्रातील सहकार्याला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
झांबियाच्या उच्च शिक्षण कर्ज व शिष्यवृत्ती मंडळचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॉन मचायी, शिष्यवृत्ती विभागाचे व्यवस्थापक फ्लेमिंग मुकोशा तसेच स्कायगोल्ड शैक्षणिक सल्लागार संस्थाचे व्यवस्थापकीय संचालक प्राईड एम. सिंकाला यांचा प्रतिनिधी मंडळात समावेश होता.
वारणा विद्यापीठात आगमनानंतर मान्यवरांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. त्यानंतर आयोजित संवाद सत्रात विद्यापीठातील शैक्षणिक कार्यक्रम, संशोधन उपक्रम, उद्योगाभिमुख शिक्षण, कौशल्य विकास, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध अत्याधुनिक सुविधा यांची सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रतिनिधी मंडळाने विद्यापीठ परिसरातील अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे, ग्रंथालय, स्मार्ट क्लासरूम्स (सुसज्ज डिजिटल वर्गखोल्या) तसेच विविध शैक्षणिक व संशोधन सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, तंत्रज्ञानाधारित शिक्षण व्यवस्था आणि जागतिक दर्जाचे शैक्षणिक वातावरण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
या भेटीदरम्यान विद्यार्थी देवाणघेवाण कार्यक्रम संयुक्त संशोधन प्रकल्प , शिष्यवृत्ती योजना तसेच शैक्षणिक भागीदारी यांच्या विविध संधींवर सकारात्मक चर्चा झाली. भविष्यात झांबियातील विद्यार्थ्यांना वारणा विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
या प्रसंगी वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिनी, प्राचार्य डॉ. के. आय. पाटील, डॉ. एस. एम. पिसे, डॉ कल्पना पाटील विविध संकुलांचे अधिष्ठाता ॲडमिशन इन्चार्ज, डॉ अमोल पाटील, डॉ. उमेश देशांनवर, प्रा. राहुल कुंभार विभागप्रमुख, प्राध्यापक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे तसेच कुलाधिकारी एन. एच. पाटील यांनी प्रतिनिधी मंडळाच्या भेटीबद्दल शुभेच्छा देत, अशा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला.
भारत-झांबिया शैक्षणिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार असून, वारणा विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या वाटचालीतील एक उल्लेखनीय टप्पा म्हणून तिची नोंद घेतली जात आहे.