स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अभियांत्रिकी प्रवेश मार्गदर्शन सत्राला उदंड प्रतिसाद
schedule29 Jun 26 person by visibility 105 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘केंद्रीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व चर्चासत्राला विद्यार्थी आणि पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
एमएच-सीईटी २०२६ मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील अचूक, अद्ययावत व सविस्तर माहिती मिळावी, या उद्देशाने २७ जून रोजी या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
यावेळी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्रभारी संचालक डॉ. अजित कोळेकर यांनी सांगितले की, योग्य माहिती आणि योग्य निर्णय यांच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार, गुणवत्तेनुसार आणि करिअरच्या उद्दिष्टांनुसार महाविद्यालय व शाखेची निवड करावी. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये देश-विदेशात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जाणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये पदवी स्तरावर कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखांमध्ये शिक्षण दिले जाते. तसेच पदव्युत्तर स्तरावर कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, एनर्जी टेक्नॉलॉजी आणि एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या शाखांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध असून अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये पीएच.डी. अभ्यासक्रमाची सुविधाही उपलब्ध आहे.
प्रशिक्षण व प्लेसमेंट सेल अधिकारी तथा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. गणेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना सुमारे दीड तास सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी केंद्रीय नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, गुणवत्ता यादी (Merit List), पर्याय फॉर्म (Option Form) भरण्याची योग्य पद्धत, CAP च्या विविध फेऱ्या, महाविद्यालय व शाखा निवडीचे निकष, प्रवेश निश्चिती प्रक्रिया, शुल्क, शिष्यवृत्ती योजना तसेच विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली.
यासोबतच भविष्यातील रोजगाराच्या संधी, उच्च शिक्षणाच्या संधी, विविध शिष्यवृत्ती योजना, विद्यापीठाच्या विविध विद्यार्थी कल्याणकारी योजना, सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेली फी सवलत व मोफत वसतिगृह योजना, तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण स्वरूप याविषयीही विद्यार्थी व पालकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
मार्गदर्शन सत्रानंतर प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थी व पालकांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील विविध शंकांचे निरसन करण्यात आले. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रथम वर्ष प्रवेश समन्वयक डॉ. महेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणीमध्ये डॉ. विश्वास पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. डॉ. वैशाली सावंत, डॉ. अमर डूम, डॉ. चेतन आवटी आणि डॉ. श्रीपाल गायकवाड यांनी परिश्रम घेतले. डॉ. हर्षवर्धन पंडित यांनी आभार मानले.