दुष्काळी परिस्थितीत पाणी बचतीसाठी खोडवा उसात ‘एक आड एक सरीत पाचट आच्छादन’ करा
schedule08 Nov 26 person by visibility 182 categoryराज्य
◼️पाचट न जाळता कडधान्य व चारा पिकांचे आंतरपीक घ्या; पाण्याची ५० टक्क्यांपर्यंत बचत शक्य – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
कोल्हापूर : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या सुमारे ५० टक्के पाऊस झाला असून काही भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढत असल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी खोडवा व निडवा उसातील पाचट न जाळता ‘एक आड एक सरीत पाचट आच्छादन व रिकाम्या सरीत कडधान्य आंतरपीक’ या पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड असून, त्यापैकी जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्रावर खोडवा ऊस घेतला जातो. ऊस शेतीमध्ये पाचट व्यवस्थापन केल्यास कोणतीही अतिरिक्त आर्थिक गुंतवणूक न करता मोठ्या प्रमाणात पाणी बचत करता येते. कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार उसाला हंगामानुसार हेक्टरी २.५० ते ३.५० कोटी लिटर पाण्याची आवश्यकता असते. पारंपरिक पद्धतीने पाणी दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो.
ऊसतोडणीनंतर शेतात शिल्लक राहणारे हेक्टरी १० ते १२ टन पाचट जाळण्याऐवजी एका सरीत व्यवस्थित दाबून रचावे आणि लगतची एक सरी पूर्णपणे मोकळी ठेवावी. त्यामुळे शेतातील ५० टक्के क्षेत्र पाचटाने आच्छादित राहते. पाणी देताना पाचट असलेली सरी वगळून केवळ मोकळ्या सरीत पाणी सोडावे. केशाकर्षणामुळे मोकळ्या सरीतील ओलावा पाचट असलेल्या सरीतील मातीत पोहोचतो.
मोकळ्या सरीत वैशाखी मूग, उडीद अथवा चवळी यांसारख्या कडधान्यांची पेरणी करावी. काढणीवेळी केवळ शेंगा तोडून पिकांचे अवशेष त्याच सरीत आच्छादन म्हणून कुजवावेत किंवा जनावरांच्या वैरणीसाठी वापरावेत. तसेच पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्यासाठी मका, युतीफीड व रब्बी ज्वारी यांसारख्या चारा पिकांचीही लागवड करावी.
◼️पाचट व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण फायदे
‘एक आड एक सरी’ पद्धतीने पाणी दिल्यास हेक्टरी सुमारे एक कोटी लिटर पाण्याची बचत होते. पाचट आच्छादनामुळे बाष्पीभवन मंदावून जमिनीत १२ ते १५ दिवस ओलावा टिकून राहतो. पाचट कुजल्यामुळे हेक्टरी पाच ते सहा टन उच्च दर्जाचे सेंद्रिय खत विनाखर्च उपलब्ध होते. पाचटाच्या विघटनातून हेक्टरी ४० ते ५० किलो नत्र, २० ते ३० किलो स्फुरद आणि ७५ ते १०० किलो पालाश यांसारखी अन्नद्रव्ये जमिनीला मिळतात.
रिकाम्या सरीत कडधान्याचे आंतरपीक घेतल्यास हेक्टरी सुमारे २.५ ते ३ क्विंटल उत्पादन मिळू शकते. त्यामुळे घरगुती गरज भागविण्याबरोबरच अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो. पाचटाच्या आच्छादनामुळे तणांची वाढ कमी होत असल्याने निंदणी, खुरपणी व बगला फोडण्याच्या खर्चात एकरी दोन ते तीन हजार रुपयांची बचत होते. जमिनीचे तापमान नियंत्रित राहून गांडुळांची संख्या वाढते आणि उसाच्या उत्पादनात हेक्टरी किमान १० ते १५ टक्के वाढ होऊ शकते. सलग तीन ते चार वर्षे दर्जेदार खोडवा पीक घेणेही शक्य होते.
पाचट जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन व धूर हवेत पसरून पर्यावरणाचे नुकसान होते. तसेच आगीच्या उष्णतेमुळे जमिनीतील गांडुळे, मित्रकीटक आणि उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात. परिणामी जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होऊन जमीन कडक व नापीक होण्याचा धोका असतो.
पाचट लवकर कुजण्यासाठी तसेच जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्यासाठी ट्रायकोडर्मा, ॲसिटोबॅक्टर आणि पीएसबी यांसारख्या जैविक निविष्ठांचा वापर करावा. जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने, शेतकरी गट आणि ग्रामपंचायतींनी पाचट न जाळण्याबाबत जनजागृती करावी. शेतकऱ्यांनी या शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करण्यासाठी गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.