कोल्हापूर : दुर्गम भागात दिवाळी साहित्य वितरण
schedule08 Nov 26 person by visibility 182 categoryसामाजिक
कोल्हापूर : आपटे नगर ज्येष्ठ नागरिक संघ व उमाशंकर सेवा ट्रस्ट यांच्यावतीने शनिवारी (दि. ७) शाहूवाडी तालुक्यातील आळतुर येथील धनगरवाड्यावर ४० गरजू कुटुंबांना दिवाळी साहित्य व फराळ वाटप करण्यात आले.
या मध्ये लाडू, चिवडा, सुगंधी तेल, साबण, उटणे, पणत्या, आकाश कंदील व महिलांसाठी नवीन साड्या असे साहित्य देण्यात आले.
स्थानिक कार्यकर्ते विठ्ठल येडगे व सखाराम येडगे यांच्या सहकार्याने व गावकऱ्यांच्या मदतीने साहित्य उतरवून वाटप करण्यात आले.
प्रास्ताविकात अध्यक्ष विनायक कुलकर्णी म्हणाले, "दुर्गम वाड्या-वस्त्यांवरील लोकांना दिवाळी साजरी करणे शक्य नसते, म्हणून गेली १५ वर्षे दरवर्षी एक धनगरवाडा निवडून हा उपक्रम राबविला जातो. दानशूरांच्या देणगीतून हे कार्य सुरू आहे. मुलांना चांगले शिक्षण व संस्कार मिळावेत, शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात हाही आमचा उद्देश आहे."
यावेळी उपाध्यक्ष डॉ. देवेंद्र रासकर, अशोक चौगुले, सुरेश खांडेकर, सुधीर कुलकर्णी, शैलजा धामणकर, सुरेखा डवर यांनी मार्गदर्शन केले. गावकऱ्यांनी आभार मानले.
त्यानंतर चनवाड येथील देवघर सेवाधाम आश्रमशाळेला भेट देण्यात आली. विनाअनुदानित, देणगीतून चालणाऱ्या या शाळेत ८० मुले शिकतात. सानिया बुचडे व योहान कांबळे यांनी सादर केलेल्या भजनाने सर्वांची मने जिंकली. भजनातून मिळणाऱ्या मानधनातून शाळा चालते, अशी माहिती चालक बुचडे यांनी दिली. सर्व सदस्यांनी आश्रमशाळेला यथाशक्ती देणगी दिली.
यावेळी उपाध्यक्ष डॉ देवेंद्र रासकर, सचिव शरद दिवाण, महादेव कुंभार, रमेश काळेबेरे, वृषाली कुलकर्णी, नेहाली दिवाण, अरुण कुलकर्णी, अमर पारगावकर, संदीप बकरे उपस्थित होते.