बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी एनडी स्टुडिओमार्फत साकारणार कला प्रकल्प
schedule29 Jun 25 person by visibility 244 categoryराज्य

▪️सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत कामांचा पुन्हा प्रारंभ
मुंबई : महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी बेळगाव येथील ‘बेळगाव स्मार्ट सिटी’ मध्ये नवीन कला प्रकल्प साकारत असून आज या कामांचा सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पुन्हा शुभारंभ करण्यात आला.
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून आणि एन.डी. स्टुडिओच्या माध्यमातून बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पात सुमारे साडेतीन एकर मध्ये हा कलाप्रकल्प साकारण्यात येत होता. तांत्रिक कारणामुळे काही वर्षे या प्रकल्पाचे काम रखडले व नंतर नितीन देसाई यांचे दुर्दैवाने निधन झाले. त्यानंतर फायनान्स कंपनीकडे असलेला त्यांचा एन.डी. स्टुडिओ महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतला. आता त्याअंतर्गत बेळगाव स्मार्ट सिटीच्या उभारणीचे काम एन.डी. स्टुडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या चित्रनगरीकडे आले.
या साडेतीन एकरामध्ये होणाऱ्या कला प्रकल्पात भारतातील पाच विविध प्रांतातील खेडी, हवाई दालन , कलाप्रदर्शन असा वैविध्यपूर्ण हा प्रकल्प आहे. संस्कृती व आधुनिकता यांचा संगम असलेला प्रकल्प उभारणीचे काम गोरेगाव फिल्म सिटी करणार आहे. आज पुन्हा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांच्या उपस्थितीत कामांचा औपचारिक शुभारंभ करुन प्रकल्प उभारणीच्या कामांना सुरुवात करण्यात आली.
यावेळी गोरेगाव चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार मुख्य वित्तलेखा अधिकारी चित्रलेखा खातू, सहायक लेखा अधिकारी महेश भांगरे, त्याचबरोबर बेळगाव स्मार्ट सिटी व्यवस्थापकीय संचालक सईदा अफरीन उपस्थित होते.
प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्थानिक आमदार अभय पाटील यांनी प्रकल्पासाठी समन्वय साधून प्रकल्प मार्गी लागावा म्हणून पाठपुरावा केला. याप्रसंगी काही स्थानिक लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते.