प्रशिक्षण काळातच पोलिसांचे समुपदेशन करा : आमदार सतेज पाटील; गांभीर्याने विचार करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन
schedule03 Jul 25 person by visibility 228 categoryराज्य

कोल्हापूर : नैराश्य आणि तणाव यामुळे राज्यात पोलिसांच्या आत्महत्या वाढत आहेत. देशात मानसिक आरोग्य कायदा २०१७ मध्ये लागू करण्यात आला आहे. पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थींच्या अभ्यासक्रमातच मानसिक आरोग्य आणि समुपदेशनचा समावेश करा अशी मागणी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी अधिवेशनात प्रश्नाद्वारे केली.
आमदार पाटील म्हणाले, देशात मानसिक आरोग्य कायदा २०१७ मध्ये लागू करण्यात आल्यानंतर पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थींच्या अभ्यासक्रमातच मानसिक आरोग्य आणि समुपदेशनासाठी काही गोष्टींचा समावेश करण्याबाबत चर्चा झाली होती.
जर मानसिक आरोग्य आणि समुपदेशनाचा त्यात समावेश केला नसेल तर तो आता करावा. कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर पोलीस कल्याण निधीतून दिली जाणारी ५० हजारांची मदत १ लाखांपर्यंत वाढवा. गकर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना अनुकंपा कायदा लागू करण्यात येईल काय ? याचाही विचार करा अशा मागण्या त्यांना प्रश्नाद्वारे मांडल्या. यावर गृहमंत्री फडणवीस यांनी या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले.